मुक्त विद्यापीठाच्या 115 शिक्षणक्रमांच्या परीक्षा 24 मे 2024 पासून सूरू होणार
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षा दि 24 मे 2024 ते 12 जून 2024 याकालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठाच्या विविध 601 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रभरातून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतलेले जवळपास 4 लाख 89 हजार 660 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यासकेंद्रांना देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील देण्यात आलेले आहे, विद्यार्थ्यांनी ती वेळोवेळी बघावी.
विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र (hall ticket) उपलब्ध करून दिले असून, विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे. त्याचप्रमाणे हॉल तिकीटावर नमूद केलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षा द्यावयाची आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक इत्यादी विविध घटकातील आहेत. विविध 115 शिक्षणक्रमांच्या विविध विषय मिळून तब्बल तीस लाखाहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.