महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा – कुलगुरू डॉ पी जी पाटील
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे, विद्यापीठाने प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे आणि करत आहे. वर्ग-३ कर्मचारी व वर्ग-४ कर्मचारी यांचे करिता आश्वासित प्रगती योजना (१२:२४ योजना) ही १२०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय हा क्रांतिकारक आहे. प्रशासनामध्ये चांगले अधिकारी कार्यरत असून कुलसचिव व नियंत्रक यांच्या सहकार्याने आश्वासित प्रगती योजना (१२:२४ योजना) देण्याचा सर्वसमावेशक निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
पुणे कृषि महाविद्यालयातील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या वतीने पुणे येथील कृषि महाविद्यालयात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. यावेळी पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड, डॉ धर्मेंद्रकुमार फाळके, सहाय्यक कुलसचिव सिकंदर सय्यद उपस्थित होते. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की वर्तमान परिस्थितीमध्ये विद्यापीठात ५५ टक्के रिक्त पदे आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्याबरोबर निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. प्रशासनाने सुद्धा वेळेवरती निवृत्तीवेतन देऊन विद्यापीठासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील राहिले पाहिजे. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन व विस्ताराचे काम आणि दिलेल्या जबाबदाऱ्या जोमाने स्वयंस्फूर्तीने पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी या निमित्ताने केले. विद्यापीठ खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी असून प्रत्येकाने प्रामाणिकपणाने योगदान देऊन विद्यापीठाला उच्च पातळीवर नेण्याची गरज आहे आणि ती आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचा शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुनील मासाळकर यांचाही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रवींद्र बनसोड, डॉ धर्मेंद्रकुमार फाळके, सिकंदर सय्यद, राजेंद्र निक्रड, क्षिरसागर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बडे यांनी केले. सूत्रसंचालन अमित पवार यांनी तर आभार संजय टेकाडे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक, वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.