उच्च वंशावळीच्या देशी गायी तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज – कुलगुरु डॉ पी जी पाटील

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून राहुरी परिसरातील खडांबे येथील संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात संकरित गायीपोटी जन्मलेल्या उच्च वंशावळीच्या सहिवाल कालवडीची पाहणी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्र भारतातील एकमेव असे केंद्र आहे की ज्याठिकाणी विविध दुधाळ देशी गायी गीर, सहिवाल, थारपारकर, राठी, रेड सिंधी यांची दुधाची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र काम करत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हवामानात तग धरणाऱ्या व रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या दुधाळ देशी गायींचे संगोपन करणे गरजेचे आहे. देशी गायींचे शेण, गोमुत्र व दुध उच्च गुणवत्तेचे असून सध्याच्या काळात कॅन्सरसारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यासाठी अॅन्टीबायोटिकमुक्त दुध उत्पादन करणे गरजेचे आहे.

Advertisement
Embryo transplant technology is the need of the hour to produce indigenous cows of high pedigree - Chancellor Dr PG Patil

यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीबरोबरच आपल्या हवामानात तग धरणाऱ्या व रोगप्रतिकारक्षमता असणाऱ्या दुधाळ देशी गायी कमी कालावधीत तयार करण्यासाठी आयव्हीएफ / भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी मुक्त गोठा, मुरघास तयार करण्यावर भर द्यावा. तसेच देशी गोपालनासंबंधी पंचक्रोशीतील गोपालकांनी पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्राला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात वरिष्ठ शास्त्रज्ञ व आयव्हीएफ / भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले की, आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार केलेले उच्च वंशावळीचे सहिवाल जातीचे भ्रुण (सहिवाल पिता SA-२९ व दाता सहिवाल गाय ९-९४२२) ऋतूचक्र नियमन केलेल्या संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यातील एच. एफ. गायीच्या गर्भाशयात भुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून सोडण्यात आले. त्यातून २८० दिवसानंतर प्रत्यारोपित सहिवाल कालवडीचा जन्म झालेला आहे. कालवडीचे जन्मतः वजन २७ किलो असून प्रतिवेत दुध उत्पादन क्षमता ४००० ते ४५०० लिटर असणार आहे. कुलगुरु यांचे मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ४३ जातिवंत देशी कालवडींचा जन्म या तंत्रज्ञानातून झाला आहे. सरपंच ताकटे, माने, पानसंबळ, बाळासाहेब कल्हापुरे यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यापीठ करत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. आभार प्रदर्शन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र निमसे, सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page