डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘पेन्शन सेल’ची स्थापना

निरोप समारंभात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची अंमलबजावणी

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त होणारे कर्मचारी, शिक्षक यांचे निवृत्तीचे प्रस्ताव यासह निवृत्तीवेतन, उपदान, रजा रोखीकरण आदी विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी ’पेन्शन सेल’ची स्थापना करण्यात आल्याचे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी जाहिर केले. या सेलसाठी आस्थापना विभागात दोन कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मे अखेरीस सेवानिवृत्त होणा-या चार कर्मचा-यांचा निरोप समारंभ शनिवारी (दि.३१) घेण्यात आला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, प्रभारी कुलसचिव डॉ.गणेश मंझा यांची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.बी.बी.वायकर (वरिष्ठ प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग), शेख कदिर शेख अहेमद, (स्वयंपाकी अतिथीगृह), आर.एम.गायकवाड (झेरॉक्स मशीन ऑपरेटर, ज्ञान स्त्रोत केंद्र), ए.जी.केदारे (हेल्पर, विद्यापीठ मुद्रणालय) या चार जणांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कार मुर्तीच्या सौभाग्यवती अहिल्याताई वायकर, शेख तस्लीमा बेगम, नंदाबाई गायकवाड, पदमाबाई केदारे यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच रजारोखीकरणाचा प्रत्येकी पाच लाखांचा धनादेशही त्यांच्याकडे सुर्पद करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले, निष्ठेने काम करणा-यांचा निवृत्तीचा काळही अत्यंत आनंदाचा जात असतो. डॉ.वायकर व कदीर भाई यांच्यासह चौघांनीही अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले. जमिनीवर पाय ठेऊन काम करणारे लोक कमी होत आहेत, असेही ते म्हणाले. तर वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र ठरलो आणि मिळालेल्या संधी सोनं करण्याचा प्रयत्न केला, असेही डॉ.भालचंद्र वायकर म्हणाले. मधुमक्षिका पालन संदर्भात शेतक-यांना सहकार्य केल्याचेही ते म्हणाले. तर ’पेन्शन सेल’ सुरु केल्यामुळे निवृत्त कर्मचा-यांचे सर्व प्रश्न मार्गी लागले, कुलगुरुंचे आम्ही आभारी आहोत, असे प्रास्ताविकात डॉ.कैलास पाथ्रीकर म्हणाले. ’पेन्शन सेल’साठी वरिष्ठ सहायक डॉ.पांडुरंग शिंदे व अशोक लग्गड यांची नियुक्ती करण्यात आली. वायकर कुटुंबातील डॉ ऋतुजा निलेश पाटील, धिरज, शर्वरी यांचीही उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर संजय लांब यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com