यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’ संपन्न
शास्रीय पशुसंवर्धनातुन ग्रामीण स्वयंरोजगाराच्या व्यावसायिक संधी – कुलगुरू प्रा संजीव सोनवणे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, नाशिक विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ०९ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत एकदिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’ विद्यापीठात संपन्न झाली. त्यात राष्ट्रीय पशुधन अभियान योजना माहितीबरोबरच, शेळी-मेंढी, कुक्कुट पालन व्यवसाय वाढीच्या संधी, मुरघास तंत्रज्ञान प्रक्रिया, पशुपालकांसाठी बँक अर्थसहाय्य व सुलभ कर्जप्रक्रिया इत्यादी विषयांचा उहापोह करण्यात आला.

कार्यशाळेत नाशिकसह अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे व जळगाव या पाच जिल्ह्यामधील राष्ट्रीय पशुधन योजनेसाठी पात्र पशुपालक तसेच विभागातील तज्ञ पशुवैद्यक मिळून एकूण १८० जणांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, पुणे पशुसंवर्धन आयुक्तालयचे उपायुक्त डॉ प्रशांत भड, विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रभारी प्रमुख इंजि राजाराम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कुलगुरू प्रा सोनवणे म्हणाले की या पृथ्वीतलावर जोपर्यंत वृक्ष, पशु व मधमाशा आहेत तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व टिकून राहणार आह. त्यामुळे सर्वांनी वृक्ष, पशु व मधमाशा यांचे जतन – संवर्धन व पालनपोषण याकडे लक्ष दिले पाहिजे. मानवाची जशी प्रगती झाली तशी पशुपालनातही झाली पाहिजे. त्यासाठी मानवाने पशुपालनाचे नेमके शास्त्र समजून घेत व्यावसायिक पशुपालनाला चालना द्यावी. त्यात व्यवसाय वाढीच्या प्रचंड संधी आहेत. तसेच पशुपालकांनी स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांना देत, परस्परपुरक अनुभवांतून सामुहिक प्रगती साधण्यावर त्यांनी भर दिला.
डॉ अर्जुन गुंडे यांनी शुद्ध अनुवांशिक पशुसंगोपन व संतुलित आहार या बाबींवर काम करण्याची गरज विषद केली. डॉ प्रशांत भड यांनी राष्ट्रीय पशुधन योजनेची मार्गदर्शक तत्वे व लाभार्थी निवडीचे निकष यांवर पशुपालकांना अवगत केले. प्रास्ताविकात नाशिक विभागाच्या प्रादेशिक सहआयुक्त (पशुसंवर्धन) डॉ बी आर नरवाडे यांनी राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत यशस्वी पशुपालकांची व्यवसायपद्धती विषद केली. यानिमिताने राष्ट्रीय पशुधन योजनांविषयीची पुस्तिका उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
चांदवड येथील यशस्वी पशुपालक बिडकर परिवाराने आपला पशुपालनाचा अनुभव कथन केला. डॉ संजय शिंदे, डॉ सुनील तुंबारे, डॉ सुनील गिरणे, डॉ दशरथ दिघे यांची विशेष उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ श्याम कडूस-पाटील यांनी संपुर्ण प्रशिक्षणाचे समन्वयन व सूत्रसंचालन केले. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विद्यापीठ कृषि विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत, मंगेश व्यवहारे, डॉ प्रकाश कदम, अर्चना देशमुख, संदीप भागवत, हर्षल काळे, अमोल पुंड, माधव माळी व ऋषिकेश पवार यांनी परिश्रम घेतले.