शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश निरीक्षणाला उत्साही प्रतिसाद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री आयोजित आकाश निरीक्षण उपक्रमाला जिज्ञासू नागरिक, विद्यार्थी यांचा उत्साही प्रतिसाद लाभला. अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी उपस्थितांना खगोलीय माहिती दिली. या निरीक्षणावेळी उपस्थितांना १२ इंची दुर्बिणीच्या साह्याने गुरु ग्रह आणि त्याचे उपग्रह पाहता आले.
त्याच बरोबर विविध नेब्युला दाखवण्यात आले, ज्या मध्ये आकाशातील धूळ आणि हायड्रोजन वायू मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या पासून नवीन ताऱ्यांची निर्मिती होत असते. विविध प्रकारचे तारका समूह, आकाशगंगा यांचे दुर्बिणीच्या साह्याने निरीक्षण करण्यात आले. या आकाश निरीक्षण कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान आणि गणित विभागाचे विद्यार्थी, टेक्नॉलॉजी विभागातील शिक्षकांनी उपस्थिती लावली. तसेच, कोल्हापूर, पन्हाळा, पेठवडगाव आणि जवळपासच्या परिसरातून नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. उपस्थित नागरिकांना मोबाइलच्या विविध अॅप द्वारे आकाशातील ग्रह, नक्षत्रे आणि राशी कशा ओळखायचे याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.