शॉर्ट टर्म कोर्सद्वारे ७५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असलेले राज्य असून ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण आखले आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बजाज एन्क्यूबेशन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक डॉ. प्रवीण वक्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे, डीडीयुकेके संचालक डॉ. भारती गवळी, व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर, डॉ. गजानन सानप, व्यवसाय व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, एमडी मुकुंद कुलकर्णी, सीईओ अमित रंजन आणि डॉ. एस.जी. शिंदे उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, “इनोव्हेटिव्ह महाराष्ट्र राज्य स्टार्टअप्स 2025” या धोरणानुसार ग्रामीण भागातील तरुणांसाठी विशेष कोटा ठरवण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री स्वयंम उद्योजकता व नाविन्यता महाफंड उभारण्यात येणार आहे. शासनाकडे नोंद असलेल्या सुमारे 30 लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना एआय परीक्षेत सहभागी करून टप्प्याटप्प्याने 25 हजार उमेदवारांची अंतिम निवड होईल. निवड झालेल्या उमेदवारांना तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत आणि मार्केटिंग प्रशिक्षण देऊन स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. निवडलेल्या स्टार्टअप्ससाठी घेतलेल्या कर्जाच्या 50 टक्के व्याजाचा भार शासन उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
७५ हजार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार
राज्यातील युवकांच्या रोजगारक्षमता वाढवण्यासाठी 419 शासकीय आयटीआयमध्ये 100 हून अधिक विषयांवरील रोजगाराभिमुख शॉर्ट टर्म कोर्सेस राबवले जातील. महिला उमेदवारांसाठीही विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देत कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला चालना देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, आयटीआयमधील उपलब्ध यंत्रसामग्री, प्रशिक्षक आणि वर्गखोल्यांचा उपयोग करून नियमित वर्गाआधी किंवा नंतर अल्पकालीन कोर्सेस सुरू केले जातील. या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळेल तसेच युवांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळेल.

नोंदणी व अधिक माहिती
या अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची सुविधा पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे:
- https://admission.dvet.gov.in
- https://msbsvet.edu.in
- https://msbsvet.edu.in/Public/ITIShortTermTraining
पूरक उपक्रम
- राज्यात सुमारे 1,000 रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील 419 आयटीआय विद्यार्थी 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवत आहेत.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सर्व आयटीआयमध्ये “एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव” साजरा होत असून व्याख्यान, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शन यांचा समावेश आहे.
मंत्री लोढा यांनी राज्यातील सर्व युवक, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना या शॉर्ट टर्म कोर्सेस आणि स्टार्टअप उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
