अमरावती विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात 44 विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टंसीमध्ये मिळाली नोकरी
कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या कार्यकाळात उपलब्धी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मंगळवार 19 मार्च, 2024 रोजी झालेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये 44 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. नागपूर येथील टाटा कन्सल्टंसीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्यामध्ये एकूण 836 उमेदवारांनी रोजगाराकरीता अर्ज केले होते. त्यापैकी 174 उमेदवार लेखी परीक्षेकरीता पात्र ठरले व त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातील 141 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीकरीता पात्र ठरले. मुलाखतीनंतर 44 उमेदवारांची टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मध्ये निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना सदर कंपनीमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे, असे, कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. नोकरीकरीता निवड झालेल्या सर्व 44 विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ राजीव बोरकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाकडून अभिनंदन करण्यात आले.
वर्षभरात अनेक रोजगार मेळाव्यांचे होईल आयोजन – कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते
विद्यापीठाच्यावतीने वर्षभरात अऩेक रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल, विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावी, मुलाखत व इतर बाबींच्या तयारीत सातत्य ठेवावे, असे आवाहन याप्रसंगी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना केले.