‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘शिवराज्याभिषेक निमित्त आंतर महाविद्यालयीन विभागीय वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन
नांदेड : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी जीवन आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून महाराष्ट्र शासनाने या अनुषंगाने विविध उपक्रम व कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या निमित्ताने रयतेच्या डोक्यावर सुखाचे छत्र धरणाऱ्या छत्रपती शिवरायांचे प्रेरक तेजस्वी विचार आणि त्यांच्या कार्यांचा जागर व्हावा, अशा विविध अंगाने तो संदेश लोकांपर्यंत जावा. या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्यावर आधारित विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी रोजी १) लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज, २) शिवचरित्रापासून आपण काय शिकावे?, ३) शककर्ते शिवराय या विषयांवर आंतर महाविद्यालयीन विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर दि. २२ फेब्रुवारी रोजी चित्रकला व २३ फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती स्पर्धेचे संयोजक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील हॉल क्रमांक ३११ मध्ये रांगोळी व चित्रकला ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानिमित्ताने केवळ भारतीयांचेच नाही तर जगातील अनेकांचे स्फूर्ती स्थान असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रासोबत विचार आणि कार्यावर विद्यार्थी विचार मंथन होणार असून चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण घटना प्रसंगांचे सादरीकरण होणार आहे.
विभागीय वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना प्रथम पारितोषिक ५,००० (पाच हजार रुपये) व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३००० (तीन हजार रू.) व स्मृतिचिन्ह तसेच तृतीय पारितोषिक २००० (दोन हजार रुपये) व स्मृतिचिन्ह देण्यात येणार असून विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव आणि स्पर्धा समन्वयक डॉ. राजेश्वर दूडूकनाळे (वक्तृत्व स्पर्धा), डॉ. विजय भोपाळे (चित्रकला स्पर्धा) व डॉ. ज्ञानदेव राऊत (रांगोळी स्पर्धा) यांनी केले आहे.