डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेला नॅककडून ‘ए’ मानांकन जाहीर

तळसंदे / कोल्हापूर : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे (ता. हातणंगले, जि. कोल्हापूर) या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’कडून ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे. ‘नॅक’कडून पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाला ३.२५ सीजीपीए गुणांसह पुढील पाच वर्षासाठी हे मानांकन मिळाले असून त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली.

नॅक ‘ए’ मानांकन मिळाल्याबद्दल डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांचे अभिनंदन करताना डॉ. अनिलकुमार गुप्ता. समवेत डावीकडून श्रीलेखा साटम, डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ. के. प्रथापन, श्रीपाद धरणगुत्ती, प्रकाश भगाजे.

सोमवारी तळसंदे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, रजिस्ट्रार प्रकाश भगाजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

‘नॅक’ ही विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ची स्वायत्त संस्था असून उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकन करून त्यांना मानांकन देते. ‘नॅक’च्या टीमने 12 व 13 डिसेंबर रोजी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश आर. पावसकर, रजिस्टर प्रकाश भागाजे यांच्यासह विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. अभ्यासक्रम पद्धत, अध्ययन -अध्यापन व मूल्यांकन पद्धत, संशोधनात्मक काम, पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विविध विषयांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट, दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा आदींची सविस्तर माहिती घेतली. या माहितीच्या आधारे महाविद्यालयाचे मूल्यांकन करून महाविद्यालयाला ३.२५ सीजीपीए गुणासह ‘ए’ मानांकन जाहीर झाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

डॉ. सतीश पावसकर यांनी प्रास्ताविकामध्ये ‘नॅक’ साठीची संपूर्ण प्रक्रिया व मिळवलेले यश याबाबतचा प्रवास विषद केला. २०११ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याचा प्रयत्नात ‘ए’ मानांकन मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शन व पाठबळ व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी व पालक यांचे या यशात मोठा वाटा असलायचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. उत्तम अभियंते आणि व्यवस्थापक घडविण्यासाठी सर्वच सहकारी प्राध्यापकांचे प्रयत्न सुरु असतात. यापुढेही महाविद्यालय यशाचे नवे टप्पे गाठेल असा विश्वास यावेळी डॉ. पावसकर यांनी व्यक्त केला. हे यश मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या, योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

टेक्निकल कॅम्पसचे आयक्यूएसी डायरेक्टर प्रा. केदार सहस्त्रबुद्धे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page