सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीर यांचे व्याख्यान संपन्न
जगात विविध वैज्ञानिक शोधात भारत अग्रस्थानी – डॉ.व्यंकटेश गंभीर
सोलापूर : भारतात आपल्याला इस्रो आणि भाभा अनुसंधान संस्था या दोनच वैज्ञानिक शोध घेणाऱ्या आपल्याला माहीत आहेत. परंतु या दोन संस्थाखेरीज असंख्य संस्था भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन शोध लावून संपूर्ण जगाला मार्गदर्शन करीत आहेत असे प्रतिपादन जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या सहाय्याने दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉ. गंभीर बोलत होते.
डॉ. व्यंकटेश गंभीर पुढे बोलताना म्हणाले की, भारतीयांनी आपल्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. शिकलेले ज्ञान व्यवहारात कसे आणता येईल याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आज अनेक क्षेत्रात भारत जगामध्ये एकमेव असा देश आहे ज्याने जगात अनेक शोध पहिल्यांदा लावले आहेत. अनेक देश आपल्या देशाकडून मार्गदर्शन व सल्ला घेत आहेत. अमेरिकेतील न्यायालयात चाललेल्या एका खटल्याचा निकाल भारतातील हैद्राबाद येथील सीसीएमबी लॅब मधील अहवालावरून लावला जातो. यावरून भारताचं वैज्ञानिक क्षेत्रातील महत्व अधोरेखित होतं. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड लावावी. या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन द्यावे असेही आवाहन डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा डॉ लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विकास पाटील, डॉ. अंजना लावंड, डॉ. अभिजित जगताप, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अशोक शिंदे, डॉ. विपुल प्रक्षाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अंजना लावंड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठ संकुलातील संचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.