डॉ संजय ढोबळे यांना स्व धरणीधर गांधी स्मृती समाज शिक्षक पुरस्कार
डॉ. संजय ढोबळे हे आधुनिक काळातील अरण्यऋषी – डॉ भूषणकुमार उपाध्याय यांचे प्रतिपादन
नागपूर : पुराणकाळात अरण्यऋषी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते. आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. डॉ संजय ढोबळे हे आधुनिक काळातील अरण्यऋषी असल्याचे प्रतिपादन माजी पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी केले. डॉ गिरीश गांधी फाऊंडेशनच्या वतीने शंकर नगरातील राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात स्व धरणीधर गांधी स्मृती समाज शिक्षक पुरस्कार सोहळा बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. यावेळी डॉ उपाध्याय बोलत होते.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय शेंडे, श्रीराम काळे, डॉ कोमल ठाकरे, स्वाती हुद्दार, डॉ अनिल हिरेखन यांची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ संजय जानराव ढोबळे यांना सपत्नीक स्व.धरणीधर गांधी स्मृती समाज शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ संजय ढोबळे हे समाजाच्या समस्या ओळखून त्यावर कार्य करणारे संशोधक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थी तसेच विद्यापीठालाही झाला आहे. डॉ ढोबळे हे विद्यापीठाची शान असल्याचे कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे म्हणाले.
यावेळी डॉ संजय ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीराम काळे यांनी केले. संचालन रेखा दंडिगे यांनी केले तर आभार किशोर बुटले यांनी मानले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे, डॉ गिरीश गांधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.