गोंडवाना विद्यापीठात ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत डॉ राजेंद्र नाईकवाडे यांचे व्याख्यान संपन्न
संस्कृती ही प्रत्येक काळात साहित्याच्या रुपात विद्यमान असते – डॉ राजेंद्र नाईकवाडे
गडचिरोली : पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ द्वारा आयोजित ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत प्रमुख व्याख्याता म्हणून ते बोलत होते. ‘अभिजात मराठी भाषेचे वास्तव आणि नव्या दिशा’ या विषयावरील व्याख्यानासाठी सुप्रसिध्द लेखक डॉ राजेंद्र नाईकवाडे, नागपूर यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात गाथा सप्तशती या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करीत दीर्घ काळामध्ये आशयापासून ते अभिव्यक्तीपर्यंत अनेक घटक साहित्यकृतीमध्ये पुनरावृत्त होतात, त्यालाच अभिजातता असे म्हणतात, असे भाष्य केले.
पुढे ते म्हणाले की, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांची सरमिसळ झालेली असून त्यांना वेगळे करता येत नाही. संस्कृती ही प्रत्येक काळात साहित्याच्या रूपातच विद्यमान असते. महानुभाव पंथ, संत ज्ञानदेव, आणि संत तुकडोजी महाराज यांनी विश्वासाठी मागितलेले दान अधोरेखित करीत प्राचीन मराठी इतिहासाच्या विविध घटनांचा, संदर्भाचा उल्लेख करत मराठी भाषेचा इतिहास मांडला. त्याचसोबत मराठी भाषेच्या विकासासाठी व अभिजात दर्जा टिकविण्यासाठी मराठी भाषेला समृद्ध करणे, विविध उपक्रमांतून नवी दिशा देणे, शब्द संशोधन करणे त्यातून रोजगार मिळविणे हे खऱ्या अर्थाने बळकटी साध्य करणे आहे. स्थानिक लोकभाषांचे संवर्धन करणे हे आजच्या पिढीच्या हाती आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णा कारू, प्रमुख अतिथी म्हणून गणित विभाग प्रमुख डॉ सुनिल बागडे तसेच मराठी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार, डॉ निळकंठ नरवाडे, डॉ हेमराज निखाडे व प्रा अमोल चव्हाण उपस्थित होते.
‘अभिजात मराठी भाषेचे वास्तव आणि नव्या दिशा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोज मंगळवारला सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी देवयानी घरोटे, अध्यक्ष हर्षा पाल, उपाध्यक्ष तुषार दुधबावरे, सचिव मनीषा मडावी, सहसचिव तसेच सदस्य वैशाली गावडे, समीक्षा कोटांगले, कु उर्मिला कोटगले, कु निकिता मडावी, कु वर्षा गोहणे, धनराज धोटे यांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्प्गुच्छ देऊन निवडीबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्राध्यापक व कार्यक्रम समन्वयक डॉ निळकंठ नरवाडे यांनी तर अतिथींचा परीचय डॉ हेमराज निखाडे यांनी करून दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ कृष्णा कारू यांनी मराठी भाषा ही व्यवहार व ज्ञान भाषा व्हावयास हवी, असे भाष्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचा विद्यार्थी तुषार दुधबावरे यांनी व आभार प्रदर्शन सहायक प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अमोल चव्हाण, मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.