“स्वारातीम” विद्यापीठाचे डॉ पृथ्वीराज तौर यांना नायजेरिया जागतिक परिषदेचे निमंत्रण
‘नोबेल’ प्राप्त लेखक वोले सोयिंका यांची विशेष उपस्थिती
नांदेड : नायजेरियाची राजधानी अबुजा येथे एप्रिलमध्ये आयोजित पहिल्या जागतिक लेखक परिषदेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ. पृथ्वीराज तौर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स, युरेशियन पीपल्स असेंबली, युनेस्को आणि पेन अफ्रिकन रायटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ ते ६ एप्रिल रोजी अबुजा येथे या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युरेशियन असेंबलीच्या अध्यक्ष मार्गारीता अल आणि पेन अफ्रिकाचे महासचिव डॉ. वले ओकेदिरान यांनी स्वतंत्रपणे डॉ. पृथ्वीराज तौर यांना परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. ‘भारतीय साहित्य आणि विश्वबंधुता’ या विषयावर डॉ. तौर परिषदेत विचार व्यक्त करतील.
परिषदेसाठी नायजेरिया चे उपराष्ट्रपती कासिम शेट्टीमा, नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक वोले सोयिंका, युनेस्कोच्या गुडविल राजदूत एलेक्झांद्रा ओचिरोव्हा, नायजेरियाच्या सांस्कृतिक मंत्री हन्नतू मुसावा, शिक्षण मंत्री ताहीर मम्मन, स्मीरनोव्हा एस.के. यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. परिषदेत विविध देशातील कवी, लेखक व साहित्य अभ्यासक उपस्थित राहणार असून, आधुनिक जगातील समकालीन प्रश्नाविषयी विभिन्न सत्रांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सातव्या लिफ्ट साहित्य महोत्सवाचे व युनेस्को जागतिक कविता दिनाचे आयोजनही या काळात करण्यात येणार आहे.
डॉ. पृथ्वीराज तौर हे नव्या पिढीतील महत्त्वपूर्ण कवी, अनुवादक व साहित्य समीक्षक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य असून, वर्ल्ड पोएट्री मुव्हमेंटच्या मराठी विभागाचे निमंत्रक देखील आहेत. यापूर्वी इजिप्त येथील कैरो पुस्तक महोत्सवासाठी भारतीय लेखक म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. जागतिक लेखक परिषदेसाठी निमंत्रित केल्याबद्दल डॉ. तौर यांचे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. रमेश ढगे, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. अशोक कदम, डॉ. सरिता यन्नावार, डॉ. पराग भालचंद्र, डॉ. महेश जोशी यांनी अभिनंदन केले आहे.