एमजीएम महाविद्यालयाचे डॉ प्रविण सुर्यवंशी इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफआरसीएस पदवीने सन्मानित
डॉ. प्रविण सुर्यवंशी यांना मानद एफआरसीएस पदवी प्रदान
छत्रपती संभाजीनगर : आपली सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून कार्यरत असणारे एमजीएम रुग्णालय व महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ प्रविण सुर्यवंशी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाची समजली जाणारी एफआरसीएस ही प्रतिष्ठित मानद पदवी इंग्लंड स्थित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, ग्लासगो यांनी बहाल केली आहे. डॉ सूर्यवंशी यांनी इंग्लंड येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांकडून या पदवीचा स्वीकार केला.
डॉ प्रविण सुर्यवंशी यांनी आजवर केलेली रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याची कार्याची दखल रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन या ४४६ वर्षापूर्वीच्या संस्थेने घेतली आहे. नुकताच झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभात डॉ सुर्यवंशी यांनी असोशियन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला. विशेषत: रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनचे अध्यक्ष डॉ माईक मकर्डी यांनी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यानंतर डॉ सुर्यवंशी यांना विशेष भोजनासाठी निमंत्रित केले होते.
रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, ग्लासगो ही ४४६ वर्षापूर्वी स्थापन झालेली जगातली एक नामांकित संस्था आहे. संस्थेमार्फत युकेमध्ये विविध विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री देण्याचे काम केले जाते. त्याचप्रमाणे जगभरामध्ये शैक्षणिक, रुग्णसेवा, संशोधन आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्यावतीने मानद एफआरसीएस ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.
मराठवाड्यामध्ये एफआरसीएस पदवी मिळणारे डॉ प्रविण सुर्यवंशी हे पहिले आणि एकमेव सर्जन आहेत. त्यांनी आजपर्यंत मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपीक सर्जरी, ऍडव्हान्स इंडोस्कोपीक सर्जरीच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे एमजीएमच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी हजारो गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसेच असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये आपला सहभाग नोंदवत हजारो सर्जन्सना ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी व इंडोस्कोपीचे प्रशिक्षण दिलेले आहे.
या प्रशिक्षणामुळे आज जगभरातील गरिबातील – गरीब रुग्णांना याचा फायदा होत असून अत्यंत महागाच्या या अत्याधुनिक शस्त्रक्रिया नाममात्र शुल्कासह मोफतही होत आहेत. डॉ सुर्यवंशी यांनी एमजीएमच्या माध्यमातून मल्टी डायग्नोस्टिक शिबिरे आयोजित करून हजारो रुग्णांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया, तपासणी आणि मार्गदर्शन केलेले आहे. आजपर्यंत त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकात विविध विषयांवर ५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
ही मानद पदवी मिळाल्याबद्दल डॉ प्रविण सूर्यवंशी यांचे एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, अधिष्ठाता डॉ राजेंद्र बोहरा व सर्व संबंधितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मी आजपर्यंत करीत आलेल्या रुग्णसेवेची आणि सामाजिक कार्याची जागतिक पातळीवरील एका संस्थेने दखल घेणे, ही माझ्यासाठी व संपूर्ण एमजीएम परिवारासाठी निश्चितपणे आनंददायी बाब आहे. मी यापुढेही माझा दर्जा जपत अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.
डॉ प्रविण सूर्यवंशी