उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कै डॉ पंजाबराव देशमुख ऑनलाईन व्याख्यानमाला संपन्न
शैलेंद्र चव्हाण यांचे शेती आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन
जळगाव : नियोजन करुन शेती केली तर त्यामध्ये मोठे भवितव्य असून विद्यार्थ्याने शेतीची सर्व माहिती घेऊन तंत्रज्ञान आत्मसात करत शेतीकडे वळायला हरकत नाही असे प्रतिपादन कृषी विषयातील तज्ज्ञ पत्रकार शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कै डॉ पंजाबराव देशमुख ऑनलाईन व्याख्यानमालेत शैलेंद्र चव्हाण हे शेती आणि विद्यार्थी या विषयावर बोलत होते. शेतकरी कल्याण विश्वस्त संस्था, नवी दिल्ली यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचे आयोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे होते.
शैलेंद्र चव्हाण म्हणाले की, शेतीचा शोध महिलांनी लावला. पुढे चाकाचा शोध लागल्यावर विकसनशीलतेकडे शेतीचा प्रवास सुरु झाला. वेगवेगळे प्रयोग शेतीत केले गेले. मात्र अलिकडच्या काळात पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ऊस आणि त्यापाठोपाठ केळीला जास्त पाणी लागते. पाण्याच्या या अती वापरामुळे जमिनीचा पोत धोक्यात आला आहे. पुढील १५ ते २० वर्षात या जमीनी टिकणार नाहीत. जमीन हा पिकांचा गर्भ आहे. जमिनी टिकण्यासाठी फार प्रयत्न केले जात नाही. तरुणांनी पाण्याचा उपसा कमी व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीची संपुर्ण माहिती अवगत करावी. तंत्रज्ञान आत्मसात करावे.
कोरोनाच्या काळात व नंतर अनेक शिकलेले तरुण शेतीकडे ओढले गेले. शेतीत मोठे भवितव्य आहे. शेतीसोबतच पुरक उद्योग करण्यावर भर द्यावा. उत्पादन विक्रीसाठी सोशल मिडीयाचा वापर करावा असे सांगतांना त्यांनी इस्त्राईल मधील शेतीची उदाहरणे दिली. देश केवळ कृषी प्रधान आहे असे म्हणून उपयोगाचे नाही तर शेतकऱ्यांचा या देशात सन्मान होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात नितीन झाल्टे यांनी हे विद्यापीठ शेतकरी, कष्टकरी, आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे आहे. शेती आणि माती हा विद्यापीठाचा जिव्हाळ्याचा विषय आहे.शेतीशी नाळ तोडता कामा नये असे मत व्यक्त केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले.