अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत नागपूर विद्यापीठाचे डॉ निशिकांत राऊत सादर करणार संशोधन पेपर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक तथा आयआयएल प्रभारी संचालक डॉ निशिकांत राऊत हे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत दोन संशोधन पेपर सादर करणार आहे. डॉ निशिकांत राऊत यांना अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल सायंटिस्ट्स यांच्या वतीने आयोजित “२०२४ फार्मसाय ३६०” या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेत ही परिषद २० ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणार आहे.
‘ट्रान्सक्रिप्टोमिक ॲनालिसिस रिव्हिल्स दॅट निंफेया ओडोराटा एक्सट्रॅक्ट अँड फ्रॅक्शन्स अपरेग्युलेट दी ॲपोप्टोसिस, ऑटोफेजी, ॲण्ड अनफोल्डेड प्रोटीन कॅनॉनिकल पाथवेज् इन एमसीएफ-७ सेल्स’ आणि नोवेल काम्बिनेशन ॲप्रोच टू इनहॅन्स सोल्यूबिलीटी ॲण्ड पर्मिबिलीटी ऑफ पाझोपॅनिब युझिंग फाॅस्पोलिपीड काॅम्प्लेक्स ॲण्ड ए बायोएन्हान्सर’ असे डॉ निशिकांत राऊत यांच्या संशोधन पेपरचे विषय आहेत. औषधी विज्ञान क्षेत्रातील डॉ निशिकांत राऊत यांचे संशोधन आणि महत्वपूर्ण कार्य यामुळे अमेरिकेत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे त्यांना निमंत्रण प्राप्त झाले आहे.
या संशोधना सोबतच डॉ निशिकांत राऊत हे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयज ॲट शिकागो आणि सेंट जॉन फिशर युनिव्हर्सिटी, रोचेस्टर येथे सहचार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी देखील भेट देणार आहेत. या भेटीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि या प्रतिष्ठित संस्थांमध्ये अर्थपूर्ण भागीदारी आणि ज्ञानाचे आदानप्रदान साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये संशोधन आणि नवोन्मेषेचे कार्य उत्कृष्टपणे होत असल्याचे डॉ राऊत यांना अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल सायंटिस्ट्स या संस्थेने निमंत्रित केल्याने दिसून येत आहे. सोबतच डॉ राऊत यांचे औषधी निर्माण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे महत्त्व देखील अधोरेखित करते. डॉ निशिकांत राऊत यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.