‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मनोहर चासकर रुजू
नांदेड : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर यांची दि. १७ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडून स्वीकारला.
पदभार स्वीकारतांना डॉ. चासकर म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विद्यापीठाला एका उंचीवर नेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. या विद्यापीठाचा स्थर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर नेण्यासाठी विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानुन आपण काम करू, माझे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. आणि मी या पदाला प्रामाणिकपणे न्याय देईल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.
यापूर्वी डॉ. मनोहर चासकर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता व पुणे येथील प्रो. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत होते. डॉ. मनोहर चासकर (जन्म ३० ऑक्टोंबर १९६६) यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात एम. एस्सी. तसेच पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा प्रदिर्घ असा अनुभव आहे.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांच्यासह मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, विद्याशाखेचे सदस्य, संविधानिक अधिकारी, विद्यापीठातील संकुलाचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.