एमजीएम विद्यापीठात डॉ मनीष जोशी यांनी साधला प्राध्यापकांशी संवाद
शिक्षकांनी नावीन्यपूर्ण विचार करणे आवश्यक – प्रा डॉ मनीष जोशी
छत्रपती संभाजीनगर : उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य असणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत असतात. हे ज्ञानदानाचे काम करीत असताना शिक्षकांनी नावीन्यपूर्ण विचार करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा डॉ मनीष जोशी यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित विशेष ‘शिक्षक संवाद’ कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ मनीष जोशी यांनी प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ शशांक दळवी, सर्व अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. जोशी म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवत असताना वेगळा विचार त्यांना देणे आवश्यक आहे. या वेगळ्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. त्याचप्रमाणे उपलब्ध समस्यांवर उत्तर शोधत असताना विद्यार्थ्यांना कायम त्या समस्यांच्या मुळाशी जात उपाय शोधायला लावले पाहिजेत. यातून विद्यार्थ्यांचा विकास होण्यास मदत होत, विद्यार्थी अधिक विचारशील होतात. कोणत्याही समस्येवर उपाय शोधात असताना काय वेगळेपणे आणि काय विचार वेगळा करू शकू? यावर काम करणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थ्यांनी रुळलेल्या वाटणे जाण्यापेक्षा वेगळा विचार करणारी मानसिकता विकसित करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे.
महाविद्यालयीन वेळेमध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो ह मात्र, महाविद्यालयीन वेळेमध्येसुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असते. मानसिक ताणतणाव, वैयक्तिक अडचणी, भाषेची भीती, न्यूनगंड, कौटुंबिक समस्या इ. मध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका निभावत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हिताला आणि विकासाला प्राधान्य देत विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक सत्र जून – जुलैसह आता जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी, भारतीय ज्ञान परंपरेचे शिक्षण असे अनेक उपक्रम सुरू केले असल्याचे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.
या संवाद सत्रामध्ये शिक्षकांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना डॉ. जोशी यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ.परमिंदर कौर धिंग्रा यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी मानले.