भारतातील टॉप-टेन शास्त्रज्ञांमध्ये अमरावती विद्यापीठाचे डॉ महेंद्र रॉय यांना स्थान
विद्यापीठाच्या नावलौकीकात भर, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ महेंद्र रॉय यांना भारतातील टॉप-टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. एवढेच नव्हे, तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार डॉ रॉय यांना जगातील सर्वोच्च दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीतही स्थान मिळाले आहे. डॉ महेंद्र रॉय यांच्या या उपलब्धीमुळे विद्यापीठाच्या नावलौकीकात भर पडली असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ राय यांनी हंगेरी देशातील डेबरसन विद्यापीठातील नॅनोफुड प्रयोगशाळेमध्ये अतिथी शास्त्रज्ञ म्हणून कार्य करीत असतांना मल्टीड्रग प्रतिरोधक सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी कार्बन नॅनोडॉट्सचा अभ्यास केला आहे. नॅऩो आधारित अँटीमायक्रोबियलवरील कार्यासाठी प्रसिध्द असलेले डॉ रॉय यांचे संशोधन अतिशय मोठे आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि नॅनोमेडिसिनचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी त्यांनी चांदीच्या नॅनोकणांवर अभ्यास केला.
त्याचबरोबर ते आता वनस्पती रोगांचे व्यवस्थापन यावरही अभ्यास करीत आहेत. 450 हून अधिक शोधनिबंध, स्प्रिंगर, अॅल्सवियर, वायली यासारख्या प्रतिष्ठीत प्रकाशकांव्दारे प्रकाशित 75 पुस्तकांसह त्यांनी 102 पेक्षा जास्त लेख सुध्दा लिहिले आहेत. आपल्या कार्यासंदर्भात ते म्हणतात, नॅनोविज्ञान आज प्रत्येक क्षेत्रात वेगाने वाढत आहे. बुरशीचा वापर करुन धातू नॅनोकणांच्या हरित संश्लेषण आणि मल्टीड्रगरोधी सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी काय करता येईल याकडे आता लक्ष देत आहे.
डॉ रॉय यांना फादर टी ए मॅथिअस अवार्ड (1989), भारत सरकारचा मेदिनी अवार्ड मिळाले आहेत. तर यावर्षी त्यांना त्यांच्या रिसर्च डॉट कॉम बायोलॉजी व बायोकेमेस्ट्रीमध्ये इंडिया लिडर अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ राय यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रााझिल, स्वित्झर्लंड, हंगेरी, पोलंड, इटली यासारख्या अनेक देशांमध्ये कार्य पसरलेले आहे. त्यांनी जिनेव्हा विद्यापीठ, निकोलस कोपर्निकस विद्यापीठासह जगभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये अतिथी वैज्ञानिक व प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे.
2021 ते 2023 कालावधीतील त्यांच्या कार्यासाठी पोलिश सरकारने त्यांना एन ए डब्ल्यू ए फेलोशिप देऊन सन्मानित केले आहे. संशोधनाव्यतिरिक्त, डॉ राय 20 आंतरराष्ट्रीय जर्नल्स, 10 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्यही आहेत. आयईटी नॅनोबायोटेक्नॉलॉजीचे सहयोगी संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तीन दशकाहून अधिक शिक्षण व संशोधनात ते सातत्याने कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कार्य युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉ रॉय यांच्या या उपलब्धीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.