अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ महेंद्र ढोरे यांनी पदभार स्वीकारला

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथील प्राचार्य डॉ महेंद्र पुंडलिकराव ढोरे यांची विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने एकमताने प्र-कुलगुरूपदी निवड केली होती. प्र-कुलगुरू पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर यांनी डॉ महेंद्र ढोरे यांना प्र-कुलगुरू पदाचा पदभार प्रदान केला. याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर यांनी पुष्पगुच्छ देवून डॉ महेंद्र ढोरे यांचे स्वागत केले.

प्र-कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र कडू, डॉ प्रविण रघुवंशी, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, डॉ रविंद्र सरोदे, डॉ सुलभा पाटील, प्रा स्वाती ढोरे, बंधू अजय ढोरे, यांचेसह डॉ ढोरे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे एम एस्सी, एम फिल असून विज्ञान विषयात त्यांनी आचार्य पदवी मिळविली आहे. त्यांना पदवी व पदव्युत्तर स्तरावरील 27 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे गणना सिद्धांत, कम्प्लायर कन्स्ट्रक्शन, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, संगणक ग्राफिक्स, मोबाईल संगणन, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, डॉक्युमेन्ट इमेज अॅनॅलिसीस, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डाटा अॅनॅलिसीस ही त्यांची सारस्य क्षेत्र आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी संशोधन करुन आचार्य पदवी मिळविली आहे.

Advertisement

याशिवाय सहा विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहे. त्यांनी ‘दस्तऐवज प्रतिमा विश्लेषणातील विविध विभाजन तंत्रांचा अभ्यास’ या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून प्राप्त झालेला प्रमुख संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. याशिवाय ‘बिग डाटा विश्लेषणातील आव्हानांचा अभ्यास’ या विषयावर लघु प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यांचे एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले असून एक कॉपी राईट त्यांना बहाल झाले आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 46 संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

त्यांनी थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशांना शैक्षणिक कार्यासाठी भेटी दिल्या आहेत. त्यांनी विविध शैक्षणिक पदे सांभाळली आहेत, त्यामध्ये नॅक मूल्यांकनकर्ता, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे सह-नियुक्त सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच विद्वत परिषदेचे सदस्य, याशिवाय विविध प्राधिकारणींवर कार्य केले आहे. कॉम्प्युटर सोसायटीचे ते वरीष्ठ सदस्य राहिले आहेत. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाने डॉ आर क्रिष्णकुमार सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून सुवर्णपदक सन्मान प्रदान केला आहे. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीद्वारे दोन वर्ष कालावधीची शिक्षक फेलोशीप, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूरचे सर्वोत्कृष्ट शिक्षक आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

उच्च विद्याविभूषित, शैक्षणिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचा शैक्षणिक विकास निश्चितच उंचावणार आहे. विद्यार्थीप्रिय असलेल्या डॉ ढोरे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page