डेक्कन कॉलेजमध्ये डॉ. म. अ. मेहेंदळे चर्चासत्र उत्साहात संपन्न
पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक म्हणून कै. प्रा. डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे नाव सर्वश्रुत आहे. प्रा. मेहेंदळे यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संस्कृत विभागात अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. विभागाच्या संस्कृत शब्दकोश प्रकल्पात संपादकाच्या रूपात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधक संस्थेतील महाभारताची संशोधित आवृत्ती तयार करण्याच्या प्रकल्पाची धुराही त्यांनी सांभाळली. प्रा. मेहेंदळे यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने वार्षिक चर्चासत्र सुरू करण्यासाठी मोठी देणगी मेहेंदळे कुटुंबीयांनी डेक्कन कॉलेजला दिली. त्यानुसार दर वर्षी प्रा. मेहेंदळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे चर्चासत्राचे आयोजन येथे करण्यात येते. त्यांच्या अभ्यासाचे विषय असलेले संस्कृत साहित्य, भाषाशास्त्र, पुराभिलेखविद्या यांसंबंधित विषयांतील शोधनिबंध यामध्ये सादर होतात. चर्चासत्रात सादर होणाऱ्या तरुण संशोधकांच्या सर्वोत्कृष्ट तीन शोधनिबंधांना अनुक्रमे रु. ८०००, रु. ७००० व रु. ५००० ची रोख पारितोषिके दिली जातात. बक्षिसासाठी निबंधवाचन करणाऱ्या तरुण संशोधकांबरोबरच ज्येष्ठ व विद्वान संशोधकही मेहेंदळे सरांविषयी आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आपले निबंध सादर करतात.
या मालिकेतील चौथे चर्चासत्र दि. 14.02.2024 रोजी बुधवारी संपन्न झाले. भारताच्या विविध भागांतून अनेक निबंधसारांश चर्चासत्रासाठी पाठवण्यात आले होते. त्यांतून निवड करून अकरा संशोधकांना शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली. अकरापैकी नऊ निबंध पारितोषिकाच्या स्पर्धेत होते. संशोधकांचे सादरीकरण व त्यावर प्रश्नोत्तरे होऊन डॉ. श्रीधर लोहोकरे, संघमित्रा ठाकूर व राज अधिकारी यांच्या शोधनिबंधांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके जाहीर करण्यात आली. परीक्षक म्हणून ज्येष्ठ संस्कृतज्ञ प्रा. डॉ. माधवी कोल्हटकर व प्रा. डॉ. पूर्णचंद्र साहू यांनी काम पाहिले. तरुण संशोधकांच्या विषयनिवडीचे कौतुक करून शोधनिबंध लिहिण्यासंबंधीचे, तसेच संशोधनाला आधुनिक काळाशी जोडण्यासंबंधीचे मार्गदर्शन त्यांनी केले. डेक्कन कॉलेजचे उप-कुलगुरू प्रा. डॉ. प्रसाद जोशी, भाषाशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल कुलकर्णी यांसहित कॉलेजच्या विविध विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थिवर्ग या वेळी उपस्थित होता. प्रा. जोशी यांनी यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. संहिता जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. चर्चासत्राच्या समन्वयक म्हणून डॉ. ऋचा अभ्यंकर यांनी काम पाहिले.