डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘सेवा संकल्प’ हा विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज व उदगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उदगाव (ता शिरोळ) येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ‘सेवा संकल्प’ हे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्द्घाटन प्रमुख पाहुणे अनिल उर्फ सावकार मदनाईक (माजी बांधकाम सभापती, पंचायत समिती शिरोळ) आणि डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे डायरेक्टर डॉ सुनील आडमुठे यांच्या हस्ते झाले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे तरुणाईमध्ये समाजसेवेची भावना रुजवण्याचे महत्त्व पटवून दिले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरुण कोळी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील आणि उपप्राचार्य डॉ सतीश किलजे उपस्थित होते.
या शिबिरात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील 50 विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम, स्त्रीशक्ती व व्यवस्थापनावर व्याख्याने आणि पथनाट्य सादरीकरण यांचा समावेश होता. शिबिरातील ठळक कार्यक्रमांमध्ये प्रा सुरज चौगुले यांचे “राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिक बांधिलकी” या विषयावर व्याख्यान, योगगुरु मोहन कवठेकर यांचे योग शिबिर, कवी व लेखक प्रा रविराज माने यांचे “मी आणि माझ्या कथा” या विषयावरील सत्र, तसेच प्रताप रघुनाथ चिपळूणकर यांचे सेंद्रिय शेती व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन यांचा समावेश होता. तसेच डॉ प्रियंका गायकवाड यांचा स्त्रीशक्ती अधूनकतेची गरज यावर व्याख्यान पार पडले.
शाहीर शिवतेज जाधव यांनी “ज्वलजलंत संभाजी राजा” या पोवाड्याद्वारे ग्रामीण भागात इतिहासप्रेरित जनजागृती केली. गोकुळ दूध संघाचे चीफ क्वालिटी मॅनेजर बी एस पाटील यांनी “दूध उत्पादन आणि व्यवस्थापन” यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोफत आरोग्य शिबिरे व वृक्षारोपण उपक्रम राबवून समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ २०० हून अधिक ग्रामस्थांनी घेतला. याव्यतिरिक्त, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले.
शिबिरासाठी श्री ब्रम्हनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कुंजवण, उदगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम आणि व्हाईस- चेअरपर्सन अॅड डॉ सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा प्रणिल तोरसकर, प्रा सुमन होळीकरी, प्रा शुभम पाटील, प्रा सौरभ समडोळे, प्रा रामलिंग माळी, प्रा रोहण लाटवडे, प्रा प्रतीक उगारे, प्रा विनोद पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधि सात्विक चव्हाण यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले. शिबिराचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी “होम मिनिस्टर” या विशेष कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमाने ग्रामीण भागातील लोकांना समाजसेवेची भावना आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.