डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नायपर परीक्षेत घवघवीत यश
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दत्ता जाधव, यश चव्हाण, ओंकार पाटील आणि ओंकार आलासे यांनी नायपर जीईई अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च २०२४ च्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत घवघववित यश संपादन केले.

ही परीक्षा यावर्षीच्या जून महिन्यात घेण्यात आली होती. नुकताच या वर्षीच्या परीक्षेचा निकाल २१ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत दत्ता जाधव याने संपूर्ण भारतातून ४ था क्रमांक, यश चव्हाण याचा १२३ वा क्रमांक, ओंकार पाटील याचा ३१३ वा क्रमांक आणि ओंकार आलासे याचा १४९७ वा क्रमांक पटकविला आहे.
नायपर ही सर्वात महत्त्वाची परीक्षा असून, ही परीक्षा औषधनिर्माण शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम फार्मसी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यंदाची ही परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या गुवाहाटी या शाखेमार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नायपरच्या मोहाली, हैदराबाद, हाजीपूर, कोलकत्ता, रायबरेली, गुवाहाटी आणि अहमदाबाद यांसारख्या नामांकित सरकारी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच अनेक उच्चशिक्षणाचे पर्याय खुले होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या या अग्रगण्य यशामुळे डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच त्यांच्या या यशामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या परीक्षेसाठी डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
तसेच डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम, व व्हाईस चेअर पर्सन ऍड डॉ सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ विजय मगदूम यांनी सांगितले की या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे हे यश साध्य झाले असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे. तसेच ही यशाची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील असे प्रतिपादन केले.