डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचा १६ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो – डॉ भाग्यश्री पाटील
पिंपरी/पुणे : डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (डीपीयू), (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे येथे 26 मे 2025 रोजी विद्यापीठाच्या सभागृह्यामध्ये 16 वा पदवीप्रदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.

या समारंभाला महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा; डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती डॉ पी डी पाटील, प्र-कुलपती डॉ भाग्यश्री पी पाटील, कुलगुरू डॉ एन जे पवार, डॉ डी वाय पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती डॉ सोमनाथ पाटील, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे च्या प्र-कुलगुरू डॉ स्मिता जाधव, आणि डॉ डी वाय पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार डॉ यशराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ पी डी पाटील, कुलपती, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (डीपीयू), पिंपरी, पुणे म्हणाले, “पदवीप्रदान समारंभ हा आत्मपरीक्षण आणि नवचैतन्याचा क्षण असतो. डॉ डी वाय पाटील विद्यापीठाची स्थापना या विश्वासावर झाली की शिक्षण हे सशक्त आणि प्रगत समाजाचे भक्कम पायाभूत तत्व आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे आणि शैक्षणिक नेतृत्वाचे समर्पण या दृष्टीला वास्तवात उतरवत आहे. आजही आमचा उद्देश स्पष्ट आहे— अशा ज्ञानसमृद्ध व्यक्ती घडवणे जे प्रत्येक टप्प्यावर ज्ञान, सामाजिक हीत हा उद्देश घेऊन पुढे जातील.”
महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त महासंचालक, पोलीस (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा राज्य यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (ऑनोरिस कौसा) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संबोधन केले. त्यांनी म्हटले,”तुमची खरी वाटचाल आता सुरू होते. सदैव शिकण्याची वृत्ती ठेवा आणि तुम्हाला घडवणाऱ्या मुळांबद्दल व नात्यांबद्दल कधीही विसरू नका. जीवनात मार्गदर्शक पाच तत्व म्हणून चारित्र्य, धैर्य, विनय, बांधिलकी, आणि श्रद्धा यांवर विश्वास ठेवा. मला आशा आहे की तुम्हाला तुमचा हेतू सापडेल आणि तुम्ही तो उत्कृष्टतेने पूर्ण कराल.”
डॉ भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (डीपीयू), पिंपरी, पुणे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना म्हटले, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नाही, तर जीवन, समाज आणि संपूर्ण राष्ट्राचे परिवर्तन घडवण्याची प्रक्रिया आहे. डॉ डी वाय पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो. आज जेव्हा आमचे विद्यार्थी जगाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छिते की, सहवेदना, धैर्य आणि सद्गुणांचा वारसा अभिमानाने पुढे नेत राहा. तुमची वाटचाल केवळ यशाकडेच नव्हे, तर सेवा, सन्मान आणि समाजकल्याणाकडे असावी. आजचा पदवीप्रदान समारंभ हा केवळ एक औपचारिकता नाही, तर एका महान जबाबदारीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे आणि आपले नेतृत्व भविष्य घडविण्याचे आदर्श उदाहरण आहे.”
या समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 31 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 12244 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 73 विद्यावाचस्पती (पीएच डी), 10884 पदव्युत्तर पदवी, 1276 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत तसेच विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि डॉ एन जे पवार, कुलगुरू यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला, ज्यामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे विवरण करण्यात आले.