डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजी -माजी कुलगुरुंचे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’वर मंथन
विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला स्वातंत्र्य देणारे धोरण
- ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ कार्यशाळेतील सूर
- ४३२ प्राध्यापकांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंतच्या शिक्षणपध्दतीने विषयनिहाय शिक्षक व त्यानूसार विद्यार्थ्यांना विषय शिकावे लागत होते. मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अध्ययन-अध्यापन पध्दतीत क्रांतीकारी बदल करणारे असून विद्यार्थ्याच्या आवडी-निवडीला स्वातंत्र्य धोरण आहे, असा सूर ’एनईपी-२०२०’ कार्यशाळेत निघाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’ अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत अभ्यासमंडळ सदस्य, अध्यक्ष यांच्यासाठी शुक्रवारी (दि.१६) दिवसभर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ आर डी कुलकर्णी, माजी कुलगुरु डॉ नितीन करमाळकर, डॉ पंडित विद्यासागर हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ जी डी खेडकर यांनी यांच्यासह सर्व अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ नितीन करमाळकर यांनी ’भारतीय ज्ञान परंपरा’ (आयकेएस ) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अत्यंत साचेबध्द व संकिर्ण असलेल्या शिक्षणात क्रांतीकारी व मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीने दहा वर्षापुर्वी सुरुवात झाली. मधल्या काळात राबविलेली ’चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ ही अपयशी ठरली. आजपर्यंतच शिक्षण विद्याथ्र्यांना विषय निवडीचे अल्प स्वातंत्र्य देत होते. नविन धोरणात विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याच्या आहे. भारताची ज्ञान परंपरा अत्यंत समृध्द असून आंतरविद्या शास्त्र दृष्टीकोन ही देखील परंपरा आहे. त्यामुळे सुरुवातीला किचकट करणारे हे धोरण सुलभ असल्याचा प्रत्यय येईल, असा विश्वासही डॉ.करमाळकर यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना ज्ञानी नव्हे, जिज्ञासू बनवा – डॉ विद्यासागर
आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांना ’ज्ञानी’ करण्यातच वेळ आणि मेहनत खर्ची घातली. वास्तविक मुलांना जिज्ञासू बनवा . त्यामुळे ते ज्ञानी, गुणी आणि कुशल बनतील, असे माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर म्हणाले. राष्ट्रीय धोरणात अंडरस्टॅडिंग, प्लॅनिंग, इम्पलीमेंटेशन’ या तीन बाबीवर भर देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. सुमारे एक तासाच्या भाषणात त्यांनी अभ्यासक्रम, क्रेडिट सिस्टीम याविषयी विवेचन केले. सकाळच्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु ’क्रेडिट सिस्टीम’ न अभ्यासक्रमाची रचना या विषयी मार्गदर्शन केले. ’पॉवर पाँईट’ सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. तर हे धोरण रावीताना सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, असे प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून होत असल्याचे अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सांगितले. ’आयक्वॅक’चे संचालक डॉ. गुलाब खडेकर यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. यावळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, समन्वयक डॉ.एम.डी जहागीदार यांच्यासह सर्व अधिष्ठातासह , विद्या परिषद, अभ्यास मंडळ सदस्य सहभागी झाले. सर्व अभ्यासमंडळ सदस्य, अध्यक्ष, विद्या परिषद सदस्य, विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली . विद्यापीठ नाटयगृहात सकाळी १० ते ५ या दरम्यान कार्यशाळा झाली. कार्यशाळेसाठी डॉ.गिरीष काळे, रोहन गावडे आदींनी परिश्रम घेतले. दुपारच्या सत्रातील प्रश्नोत्तरात डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.सुयोग अमृतराव, डॉ. निर्मला जाधव, डॉ. पांडुरंग कल्याणकर, डॉ.संदीप देशमुख, डॉ. अनुसया चव्हाण यांनी सहभाग घेतला .