डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’लॅब टू लॅण्ड’चा प्रयोग यशस्वी

कलमीकरण केलेल्या ’केशर आंब्याची सहा हजार रोपे तयार

शेतकऱ्यांना रोपे वितरीत

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’लॅब टू लॅण्ड’ उपक्रमांतर्गत केशर आंब्याच्या सहा हजार रोपांचे कलमीकरण करुन रोपे तयार करण्यात आली आहेत. लागवडीस तयार रोपांचे शेतकऱ्यांना वितरण सुरु करण्यात आले आहे.

’गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन व विकास केंद्र’ व विद्यापीठ उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नारळी बागेत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केशर आंब्याच्या कलमीकरणाचे काम सुरु करण्यात आले. अधिसभा सदस्य अरविंद नरोडे व उद्यान अक्षीक्षक किशोर निर्मळ यांच्यासह सहकारी यांनी कलमीकरण केले. दहा महिन्यानंतर केशर आंब्याची सहा हजार रोपे लागवडी योग्य तयार झाली आहेत.

Advertisement

कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी पॉलीहाऊसला भेट देऊन पाहणी केली. तसेच दुसऱ्या टप्प्याचे काम करण्याची सूचनाही केली. तयार झालेल्या सर्व रोपांची विक्री सुरु असून शेतकऱ्यांनी ’विद्यापीठ उद्यान’ अथवा पॉली हाऊस, नारळी बाग येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रोपांचे अल्प दरात वितरण करण्यात येत आहे. विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे व सामान्य प्रशासनाचे अधिकारी डॉ कैलास पाथ्रीकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना गुरुवारी (दि ४) रोपांचे वितरण करण्यात आले.

यावेळी गौतम उगले, चांगदेव पेटकर (पडेगांव), सुभाष बागडे सोमिनाथ वाघ (भालगांव), कुमार भवर, ज्ञानेश्वर पगारे (दाभाडी), उत्तम सिरसाठ (फुलंब्री) या शेतकऱ्यांनी रोपे घेतली. यावेळी उद्यान अधीक्षक किशोर निर्मळ, डॉ एस जी शिंदे, गजानन पालकर, आर बी मोरे, डॉ एम मगरे, गणेश पंडुरे, किशोर उबाळे, सोमिनाथ वाघ आदींची उपस्थिती होती. मराठवाडयात आजही शेतीवर आधारित उद्योगधंद्याचे प्रमाण मोठे असून ’लॅब टू लॅण्ड’चा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.’जीएमएन आयआरआरडी’ अंतर्गत केशर आंब्याच्या रोपांचे कलमीकरण दुसऱ्या टप्प्यात करण्यात येईल, असे कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी या भेटीवेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page