डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सुरुवात
-‘नेव्हर ॲपियर’ विद्यार्थ्यांचेही हॉलतिकीट जारी
- ६ एप्रिलचा पेपर पुढे ढकलला
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या (रिपीटर ) परीक्षा मंगळवारपासून (दि २) सुरु होणार आहेत. प्रथम वर्षांच्या परिक्षेस पहिल्यांदाच बसणाऱ्या विद्यार्थ्यांचेही (नेव्हर ॲपियर) हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा (रिपीटर) २ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. चार जिल्हयातील २७५ केंद्रावर परीक्षा होणार असून ३७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील परीक्षा सुरळीत पार व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केद्रावर सहकेंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख रुजू होण्यास अडचणी असतील अशा परीक्षा केंद्रावर त्याच महाविद्यालयातील ०१ शिक्षकांना सहकेंद्र प्रमुख नियुक्त करण्यासंबंधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
परीक्षा कलावधीत परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याकरिता जिल्हानिहाय एकूण ३७ भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच त्यामुळे कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास, अशा परीक्षा केंद्रावर तातडीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हयानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ०८ मूल्यांकन केद्र निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा केंद्र प्रमुख वगळता कोणालाही वापरता येणार नाही, अशा कडक सूचना सर्व प्राचार्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनीही परीक्षा केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट इत्यादी सोबत बाळगू नये तसे आढळल्यास परीक्षेसंबंधीच्या नियमानुार कारवाई करण्यात येईल. संबंधित महाविद्यालयाकडून हॉलतिकीटचे वितरण विहित वेळेत होणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांस पीआरएन नंबरवर परीक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. पदवी परीक्षांच्या प्रथम सत्राची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट जारी करण्यात आलेले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली . तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी व प्राध्यापकांचे प्रशिक्षण असल्यामुळे येत्या शनिवारी (दि ६) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या अखेरच्या पेपरच्या दुसऱ्या दिवशी सदर पेपर घेण्यात येईल, असेही परीक्षा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे .