डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
अमरावती : जगामध्ये अनेक क्रांती झाल्यात, पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अनेक लोकांना एकत्रित करुन देशात सामाजिक समता व सुदृढ लोकशाही निर्माण व्हावी, याकरीता रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती केली, त्यांनी एकप्रकारे हा चमत्कारच घडविला. त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यापीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, व्य.प. सदस्य डॉ. मनिषा कोडापे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पार्पण मान्यवर व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी देशात फार मोठे परिवर्तन घडवून आणले. त्यांचे विचार, तत्व, सामाजिक समतेला दिशा देणारे होते. त्यांच्या विचार व कार्याचे आत्मचिंतन देशातील प्रत्येकाने करुन आपण त्या वाटेवरुन जात आहोत की नाही, हे पाहिले पाहिजे आणि त्या मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात आपण सर्वजण कार्यरत आहात, त्यामुळे सामाजिक स्तरावर व विशेषत: विद्याथ्र्यांपर्यंत डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार व कार्य पोहचविणे ही आपली जबादारी आहे. त्याकरीता प्रत्येकाने योगदान द्यावे व तशी प्रतिज्ञा करावी, असेही ते म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, जगाच्या इतिहासात कोट¬वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात. अंधश्रध्दा झटकून टाकतात, जुन्या रुढी, संमजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जीवन जगायला नकार देतात, एवढंच काय, देव सुध्दा नाकारतात, ही किमया केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच होऊ शकली. डॉ. बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही चतु:सूत्री भारतीयांना दिली. सर्वांनी एकोप्याने व बंधुभावाने राहिले पाहिजे, तरच आपला देश जगात अधिक उंचीवर जाईल. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, महामानवाने सामाजिक मुक्तीचा लढा दिला. बळकट लोकशाही निर्माण होण्याकरीता संविधान तयार करुन समतेच्या कार्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजविले. तर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेबांमुळेच महिलांना समाजात समान स्थान, मान, न्याय, अधिकार प्राप्त झाले. देशाच्या प्रगतीत डॉ. बाबासाहेबांमुळेच महिलांना सहभागी होता आले.
प्रास्ताविक डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी, संचालन डॉ. अभिजित इंगळे, तर आभार डॉ. पवन राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.