नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागात व्याख्यानमाला संपन्न

भारतात जातिवाद व अमेरिकेत वंश-वर्णवाद सारखाच – साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ लॉचे शिक्षक डॉ केविन ब्राउन यांचे प्रतिपादन

नागपूर : भारतातील जातिवाद तर अमेरिकेत वंशवाद व वर्णवाद सारखाच असल्याचे प्रतिपादन साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ लाॅचे शिक्षक डॉ केविन ब्राऊन यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय विभाग अंतर्गत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागाच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला शनिवार, दिनांक १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी पार पडली. व्याख्यानमालेत डॉ केविन ब्राऊन मार्गदर्शन करीत होते.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी भूषविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ‘आफ्रिकन-अमेरिकन समुदाय आणि भारतीय उपखंडावरील दडपशाही यांच्यातील ऐतिहासिक संबंध’ या विषयावरील व्याख्यानात डॉ केबिन ब्राऊन यांनी पुढे बोलताना अमेरिका आणि आफ्रिकेतील कृष्णवर्णीय आणि गोरे यांच्यातील संघर्ष आणि भारतातील जातीयवाद यात बरेच साम्य असल्याचे सांगितले. तेथे काळ्या लोकांना नोकरीच्या बाबतीत त्रास दिला जातो. आता वंशवाद आणि रंगवादाबरोबरच अमेरिकेत जातीवादाचे प्राबल्य ही वाढत आहे.

Advertisement

भारताप्रमाणे तेथे ही जातींनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेत जातीवादाच्या विरोधात कायदा करण्याची मागणी होत आहे. कायद्याच्या माध्यमातून याला आळा घातला नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर फोफावणार आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियामध्ये जातीवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, राज्यपालांनी अद्याप त्याला संमती दिलेली नाही. जातीवाद मानणाऱ्या लोकांनी तेथे जात नाही, असे सांगून राज्यपालांवर दबाव आणला आहे. त्यामुळे आजपर्यंत या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळालेली नाही, असे डॉ केविन ब्राउन म्हणाले.

या काळात डॉ केविन ब्राउन यांनी भारत आणि आफ्रिकन-अमेरिकेत झालेल्या संघर्षांमधील साम्यांची उदाहरणे दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केलेल्या अस्पृश्यांच्या वकिलीला त्यांनी आफ्रिकन-अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या संघर्षाशी जोडले. त्यांनी पुणे कराराचे उदाहरण ही दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व अध्यसन विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी अध्यक्षीय भाषण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचा प्रश्न गोलमेज परिषदेत मांडल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रश्न जागतिक स्तरावरचा बनला. काळ्या नेत्यांनी ही त्यांचा वापर त्यांच्या हालचालींसाठी केला.

पुणे करार हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेविरुद्धचा मोठा विजय होता, असे डॉ फुलझेले म्हणाले. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आणि गुन्हा आहे हे देशाने प्रथमच मान्य केले. त्यानंतर अस्पृश्यांना वेगळे अधिकार देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय नेते डॉ डू बोईस यांच्या सोबत पत्रव्यवहार करून या विषयीची समस्या जाणून घेतल्या होत्या, असेेे डॉ फुलझेले यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गौतम कांबळे यांनी केले. संचालन विजय बडोदेकर यांनी केले तर आभार मिलिंद वालदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page