डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अद्ययावत ‘युजर फ्रेंडली’ संकेतस्थळ कार्यान्वित — कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नव्या डिजिटली युगाशी सुसंगत, अद्ययावत आणि युजर फ्रेंडली संकेतस्थळाचे लोकार्पण आज कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात सकाळी आयोजित या कार्यक्रमात संकेतस्थळाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

नवीन संकेतस्थळ हे विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी आणि संलग्नित महाविद्यालयांसाठी अधिक सुलभ आणि उपयोगी बनवले गेले आहे. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी यावेळी सांगितले की, “कोणत्याही संस्थेची वेबसाईट ही तिचा आरसा असते, आणि म्हणूनच ही वेबसाइट अधिक आकर्षक, नाविन्यपूर्ण व वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे.” कार्यक्रमात प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यापीठाचे अधिष्ठाता व संवैधानिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘युनिक’च्या माध्यमातून संकेतस्थळाचे नूतनीकरण

संकेतस्थळाचे ‘अपग्रेडेशन’ युनिव्हर्सिटी नेटवर्किंग अ‍ॅण्ड इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर (युनिक) यांच्या तांत्रिक टीमने केले आहे. डॉ. प्रवीण यन्नावार यांच्या नेतृत्वाखालील युनिक टीममध्ये प्रोग्रामर यशपाल साळवे, दिनेश कोलते, सचिन चव्हाण, दत्तात्रय पर्वत, राजेश राठोड, प्रमोद गवळी, रविंद्र बनकर, माधुरी कुलकर्णी आदींचा मोलाचा सहभाग राहिला. यावेळी डॉ. यन्नावार यांनी प्रास्ताविक केले, तर यशपाल साळवे यांनी संकेतस्थळाची ठळक वैशिष्ट्ये सादर केली. संकेतस्थळावर SSL (सिक्युरिटी सॉकेट लेअर) सारखी सुरक्षात्मक व्यवस्था आहे व ते मोबाईल, टॅबलेट आणि पीसी अशा सर्व माध्यमांवर सहज वापरता येईल.

Advertisement

विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन

युनिक टीमने केलेल्या अभ्यासानुसार संकेतस्थळाचे प्रमुख चार वापरकर्ते—विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी, संलग्न महाविद्यालये, आणि सामाजिक घटक—या घटकांनुसार वेगवेगळी होम पेजेस विकसित करण्यात आली आहेत. वापरकर्त्याने आपली ओळख सांगितल्यानंतर त्यानुसार संबंधित डॅशबोर्ड उघडेल.विद्यापीठाच्या सर्व सेवा आणि आवेदन प्रक्रियांना ऑनलाइन स्वरूप देण्याचा निर्णय कुलगुरूंनी यापूर्वीच घेतला असून, ‘समर्थ पोर्टल’च्या माध्यमातून प्रवेश व भरती प्रक्रियाही राबवली जात आहे.

कार्यक्रमासाठी सतीश जगदाळे, अमित दहिभाते, उमेश पवार, वसीम पठाण, नितीन मुंगसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या नव्या संकेतस्थळाच्या कार्यान्वयानंतर, विद्यापीठाच्या डिजिटल सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक होतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *