डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा

नामांतर चळवळीतून तरुणांमध्ये आत्मभान जागृती – प्रा. फ. मु. शिंदे

छत्रपती संभाजीनगर :
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नव्हता, तर तो दलित-बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा, सामाजिक अस्मितेचा आणि बौद्धिक हक्काचा ऐतिहासिक लढा होता. या नामांतर चळवळीतून तरुणांमध्ये आत्मभान व सामाजिक जाणीव निर्माण झाली, असे प्रतिपादन प्रख्यात कवी प्रा. फ. मु. शिंदे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३२ व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. अपर्णा पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University's 32nd renaming day was celebrated with enthusiasm.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University’s 32nd renaming day was celebrated with enthusiasm.

‘नामविस्ताराची हकिकत’ विषयावर प्रभावी व्याख्यान

ज्येष्ठ कवी व ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांनी ‘नामविस्ताराची हकिकत’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली. मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, ही बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती आणि त्याच विचारातून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ दिले.

नामांतराला झालेला विरोध हा शैक्षणिक नसून जातीय मानसिकता व वर्चस्वाच्या भीतीतून प्रेरित होता. नामांतराचा लढा हा सामाजिक न्याय, सांस्कृतिक संघर्ष आणि अस्मितेचा प्रश्न होता. या आंदोलनादरम्यान दलित वस्त्यांवर झालेले हल्ले, बहिष्कार व जाळपोळ हा दडपशाहीविरुद्धचा ऐतिहासिक प्रतिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला जोडले गेल्याने विद्यापीठाची उंची व नावलौकिक वाढला, असेही ते म्हणाले.


बाबासाहेबांच्या नावाला साजेसे कार्य व्हावे – कुलगुरू डॉ. विजय फुलारी

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. विजय फुलारी म्हणाले की, हिमालयाइतकी वैचारिक उंची असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला लाभणे हा खरा गौरव आहे. मात्र, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी बाबासाहेबांच्या नावाला साजेसे शैक्षणिक, संशोधनात्मक व सामाजिक कार्य करणे आवश्यक आहे. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे म्हणजे समतावादी, संविधानिक विचारांना मान्यता देणे आणि वंचित समाजासाठी बौद्धिक दारे उघडणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.


गीत भीमायनमधील २३ व्या गाण्याचे लोकार्पण

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘गीत भीमायन’ प्रकल्पातील २३ व्या गाण्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे गीत पंडित रघुनंदन पंचकर यांनी सादर केले असून, डॉ. संजय मोहड यांनी संगीत दिले आहे. विद्यापीठाला कलाप्रेमी कुलगुरू लाभल्याबद्दल पंडित पणशीकर यांनी शुभेच्छा संदेश दिला.


विद्यापीठ गीतात बाबासाहेबांचा गौरव

“गीत आमुचे आकाशाचे… गीत आमुचे सागराचे…” या विद्यापीठ गीतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘ज्ञानसूर्य’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.
“प्रज्ञेचा सूर्य नवा, शब्द शब्द उजळून गेला…”
या ओळी बाबासाहेबांच्या वैचारिक कार्याचे सार सांगतात, असे प्रा. फ. मु. शिंदे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. कैलास अंभुरे यांनी मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com