डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’नॅक’ची जय्यत तयारी
१६ समित्या गठित
सात सदस्यीय समिती तीन दिवस पाहणी करणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाचव्यांदा नॅला समोरे जात आहे. ’नॅक’पिअर टिम येत्या २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान भेट देणार असून तयारीसाठी विविध १६ समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ’नॅक’चे काम प्राधान्याने हाती घेतले. राष्ट्रीय अधिस्वकृती व अधिमान्यता परिषदेस (नॅक) स्वयं मुल्यामापन अहवाल एसएसआर सादर केला. तयारीच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी आजपर्यंत पाच वेळेस शैक्षणिक विभागांना भेटी देऊन आढावा घेतला आहे. तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांची शनिवारी (दि १९) आढावा बैठक घेऊन सूचना केल्या. प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर अंतर्गत गुणवत्ता हती कक्षाचे संचालक डॉ गुलाब खडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान, ’नॅक’पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी १४ ते १७ ऑक्टोबर या काळात ४४ विभागांसह सपोर्ट सिस्टीम राबविण्याऱ्या प्रशासकीय विभागांना (उदा वसतीगृह, ग्रंथालय आदी) भेट दिली. ’नॅक’ तयारीचा आढावा घेऊन मा.कुलगुरु यांनी सूचना केल्या. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिष्ठाता, अधिकारी नियोजनासाठी प्रयत्नशील आहेत. ’नॅक’च्या अनुषंगाने कुलगुरु डॉ संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने १५ दिवसांपुर्वी ’मॉक नॅक’ देखील केले आहे. या समितीने केलेल्या सूचनांचे पालन करुन विद्यापीठ नॅक साठी सज्ज झाले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.
सात सदस्यीय समिती
’नॅक, बंगलोर’ यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी सात सदस्यीय समिती जाहिर करण्यात आली आहे. प्रा ए एन राय यांच्या अध्यक्षतेखाली या ’पिअर टिम’मध्ये प्रा विमला एम या सदस्य समन्वयक आहेत. तर प्रा विशाल गोयल, प्रा रोव्हरु नागराज, प्रा ग्यानेंद्र कुमार राऊत, प्रा साबियासी सारखेल व प्रा के एस चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
२२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान समिती विभागांना भेट देणार आहे. ही समिती या काळात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी नियोजित काम संपेपर्यंत भेटी देणार आहे तसेच शैक्षणिक, प्रशासकीय विभागांसोबत वसतिगृहे, ज्ञानस्त्रोत केंद्रानाही भेट देणार आहे. तसेच विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कर्मचारी, व्यवस्थापन परिषद सदस्य आदींशी संवाद साधणार आहेत.