डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त संगीत सभा आणि व्याख्यान
अण्णाभाऊंच्या साहित्यात प्रस्थापित विरोधी एल्गार
अभ्यासक पंजाबराव मोरे यांचे प्रतिपादन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती
औरंगाबाद : संपुर्ण आयुष्यभर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘संघर्ष’ करावा लागला. याच संघर्षाचा धागा पकडून अण्णाभाऊंनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात वंचित, शोषितांसाठी एल्गार पुकारला, असे प्रतिपादन अभ्यासक पंजाबराव मोरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि.१) संगीत सभा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ होते. यावेळी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संचालक डॉ.वैशाली बोदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पत्रकार, अभ्यासक पंजाबराव मोरे यांचे ‘अण्णा भाऊ साठे यांच्या लोकनाट्यातील समाजभान’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात रंजनप्रधान व ललित साहित्य मोठया प्रमाणावर लिहिले जात होते. अशा काळात अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी घटकांचे वास्तव चित्रण केले. अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी ६२ कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका वंचित, शोषित, कामगार यांच्यामधून पुढे आलेले होते. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी सदैव बंड केले. तथापि आयुष्याच्या उत्तरार्धात अण्णाभाऊंना संघर्ष करावा लागला. ‘जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भिमराव’ या एकाच वाक्यात संपुर्ण जीवनपट मांडणा-या अण्णाभाऊंचा वसा आणि वारसा आपण सर्वांनी समर्थपणे पुढे न्यावा, अशी अपेक्षाही पंजाबराव मोरे यांनी व्यक्त केली.
सर्व सामान्यांसाठीचा तत्वज्ञ : डॉ.शिरसाठ
अत्यंत साध्या, सोप्या शब्दात जगण्यातून आलेले अनुभव मांडणारे अण्णाभाऊ साठे हे ख-या अर्थाने सर्व सामान्यांचे तत्वज्ञ आहेत, असे अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले. अण्णाभाऊंच साहित्य चिरकाल टिकणारे असून जगण्यासाठी उभारी देणारे आहे, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे म्हणाले. डॉ.वैशाली बोधले यांनी प्रास्ताविक तर ज्योती काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विशाखा शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ.स्मिता साबळे यांनी आभार मानले.
लोकगिते रंगली :
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.गजानन दांडगे, संजय सांगवीकर व सहकारी यांची शाहिरी गिते सादर केली. त्यांना मयुर मेहंगे, वनिता गुंड व स्वप्निल सदांशिव यांनी साथसंगत दिली .यावेळी ‘जग बदलूणी घाव, मज सांगुनी गेले भीमराव’ यासह पाच लोकगीते सादर करण्यात आली. प्रेमप्रकाश बांगर यांनी सूत्रसंचालन केले.