डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार
ऑन जॉब ट्रेनिंग, प्लेसमेंट करणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बी व्होक अभ्यासक्रमांसाठी मुंबईच्या नामांकित संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार उभय संस्थांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग, प्लेसमेंटसाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहात दोन्ही संस्थां प्रमुखांमध्ये बुधवारी बैठक होऊन या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यात ’मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर’, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट संचलित कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. तर दिनद्याल उपाध्याय कौशल केंद्र च्या पुढाकाराने रुस्तमजी अकॅडमी ऑफ ग्लोबल करिअर्स यांच्यासमवेत बुधवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, डीडीयूकेच्या संचालक डॉ भरती गवळी, उपकुलसचिव डॉ गणेश मंझा, डॉ कुणाल दत्ता तसेच रुस्तमजी अकँडमीचे संचालक डॉ हनीफ कंजर, सीओओ कारण देसाई, अतुल शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दिनद्याल उपाध्याय कौशल केंद्राचे डॉ अमोघ सांबरे, डॉ विशाल उशीर, डॉ गंगाधर बंडेवाड, रत्नदीप हिवराळे, राहुल नारनवरे यांची उपस्थिती होती.
बी व्होक इंडस्ट्रियल ऑटोमेशन (एम्बेइडेड) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ विजय फुलारी यांची भेट घेऊन चर्चा केली. या करारांतर्गत संशोधन, ऑन जॉब ट्रेनिंग, प्लेसमेंटसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या व नौकरी, उद्योगाच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आजच्या स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, कौशल्ये विद्यार्थ्यांना सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफर करून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीअंतर्गत आरोग्य विषयक विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल असणार आहे.