डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे यजमानपद
औरंगाबाद, दि.२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती मा.रमेश बैस यांनी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे यजमानपद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. विद्यापीठाच्या ६५ व्या वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला मंगळवारी ही आनंदाची बातमी ‘राजभवन’कडून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व कृषी, अकृषी विद्यापीठाचा युवक महोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येतो. चालू वर्षी ‘राजभवन’च्यावतीने जूनमध्ये आयोजित बैठकीत कुलसचिव डॉ.भगवान साखळे हे उपस्थित होते. यावेळी राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सावाचे यजमानपद घेण्याबद्दल त्यांनी उत्सुकता दर्शविली होती. या संदर्भात ‘राजभवनचे’ प्रधान सचिव संतोष कुमार यांनी या महोत्सवाचे यजमानपद विद्यापीठाला देत असल्याचे पत्र मंगळवार (दि.२२) पाठविले आहे. येत्या ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव होईल. या महोत्सवात अकृषी, कृषी, स्वायत्त व अन्य सर्व अशी एकुण ३० विद्यापीठांचे १२०० कलावंत महोत्सवात सहभागी होणार आहेत. यापुर्वी ५ ते ९ नोव्हेंबर २०१६ मध्ये या महोत्सवाचे यजमान पद आपल्या विद्यापीठाने यशस्वीपणे सांभाळले होते. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.सुहास मोराळे हे होते. दरम्यान येत्या ४ ते ७ सप्टेंबर काळात विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव विद्यापीठात होणार आहे. तसेच राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी ही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठित करुन काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
यजमानपद मिळाल्याचा आनंद : कुलगुरु
गेल्या चार वर्षात विद्यापीठ परिसरात अनेक मोठे कार्यक्रम घेण्यात आले. चालू वर्षात राज्य क्रीडा महोत्सव, अखिल भारतीय वाणिज्य परिषद तसेच पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद घेण्यात आली. राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याचा आनंद आहे. अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा घेऊ, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.