डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी सविता जंपावाड
औरंगाबाद, दि.२४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदाची सुत्रे सविता बाबुराव जंपावाड यांनी गुरुवारी (दि.२४) स्विकारली. राज्य शासनाच्यावतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सप्टेंबर २०२१ पासून लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख यांच्याकडे वित्त व लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या संदर्भात विद्यापीठाच्यावतीने राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे वित्त व लेखाधिकारी पदावर प्रतिनियुक्ती, बदलीने अधिकारी पाठविण्याची मागणी करण्यात आली. यानंतर राज्य शासनाच्या वित्त विभागाने ५५ अधिका-यांच्या बदलीची यादी ११ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली. यामध्ये धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्य लेखा परीक्षक सविता जंपावाड यांची वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदीपकुमार देशमुख यांच्याकडून त्यांनी गुरुवारी सकाळी सुत्रे स्विकारली. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्त्े श्रीमती जंपावाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.वैâलास पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती. सविता जंपावाड या गेल्या दहा वर्षापासून राज्य शासनाच्या वित्त विभागात कार्यरत आहेत. विद्यापीठात यापुर्वी शंकरराव चव्हाण व रोंद्र मडके यांनी वित्त व लेखाधिकारीपदी कार्य केले आहे.
प्रदीप कुमार यांनी ठसा उमटविला
गेल्या दोन वर्षात वित्त व लेखाधिकारी म्हणून काम करतांना प्रदीपकुमार देशमुख यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाने अनेक निर्णय घेऊन आर्थिक शिस्त आणली. यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेचा निधी पाठपुरावा करुन प्राप्त करुन घेतला. महालेखाकार यांच्या मार्फत २०१३ ते २०२१ या काळातील लेखा परीक्षण करुन घेण्यात आले. महाराष्ट्र बॅकेचे ‘एटीएम’ सुरु करुन दिले. सर्व प्रकारचे शुल्क ‘ऑनलाईन’ पध्दतीने स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले. अनेक वर्षापाूसनचे वापरत नसलेल्या वस्तुचे निर्लेखन प्रक्रिया सुरु करण्यात आली. डीसीपीएस व एनपीएस धारकांचे प्रलंबित खाते व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाची लेखा संहिती समितीवर कार्य आदी कामे करण्यात आली.