अमरावती विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात व्याख्यान संपन्न
डॉ बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे – डॉ प्रशांत रोकडे
अमरावती : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरविणे गरजेचे असून समाजाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी समाजातील सर्व शिक्षित घटकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन दिल्ली येथील जी एस टी विभागाचे सहायक आयुक्त डॉ प्रशांत रोकडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात आयोजित अतिथी व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे समन्वयक डॉ रत्नशील खोब्राागडे, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी, विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी आर वाघमारे, आंबेडकरी विचारवंत डॉ वामन गवई यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी डॉ नितीन कोळी म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून उपेक्षित समाजाचा सर्वांगीण विकास झाला. आता आर्थिक अंगाने विकास होण्यासाठी समाजाने जागृत व कृतिशील रहावे. डॉ बी आर वाघमारे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा डॉ प्रशांत रोकडे यांनी अमरावती शहरात सामाजिक गोलमेज परिषदेची स्थापना करून प्रयत्न केला. ही एक आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. डॉ वामन गवई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू आणि दूरदृष्टीकोन यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतातून डॉ रत्नशिल खोब्रागडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाची उद्दिष्ट्ये आणि वाटचाल यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. व्याख्यातांचा परिचय अभ्यास मंडळाचे सचिव वाल्मीक डवले यांनी करून दिला. प्रास्ताविक इंजि. उमेश शहारे, सूत्रसंचालन अॅड अरुण कांबळे, तर आभार मतले यांनी मानले. कार्यक्रमाला परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. राहुल नरवाडे, डॉ पवन तायडे, प्रा सुरेश पवार, प्रा रामचंद्र वरघट, प्रा कल्पना. पाटील, प्रा ओमप्रकाश झोड तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, राहुल मोहोड, इतर पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.