नागपूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात डॉ अनंत आणि लता लाभशेटवार व्याख्यानमाला संपन्न
पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज – डॉ नितीन लाभशेटवार याचे प्रतिपादन
नागपूर : पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नीरी संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ नितीन लाभशेटवार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात डॉ अनंत आणि लता लाभशेटवार व्याख्यानमाला गुरुवार, दि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली. यावेळी डॉ नितीन लाभसेटवार बोलत होते.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. यावेळी व्याख्याते म्हणून निरी येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ नितीन लाभसेटवार, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘हवामान बदल: आव्हाने आणि संधी’, या विषयावर बोलताना हवामानातील बदल आपण वापरत असलेल्या संसाधनाने होत असून शाश्वत विकासासाठी आपण वेळीच जागृत होणे गरजेचे असल्याचे डॉ लाभसेटवार यांनी पुढे बोलताना सांगितले.
हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनिश्चित पाऊस, दुष्काळ, पाणी टंचाई, समुद्रपातळीत वाढ, जैवविविधतेत घट, आरोग्य समस्या, शेतीवर परिणाम ही आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताने पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लाभशेटवार फाउंडेशन मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि व्याख्यानमालेची प्रशंसा केली. पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या विविध विषयांवर होणारी चर्चा ही नवीन पिढीकरिता दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. लाभशेटवार फाउंडेशनचे संस्थापक डॉ अनंत लाभशेटवार यांनी त्यांच्या या संस्थेची समाजाप्रती असलेली निष्ठा व समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेऊन सामाजमन जागृत करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी पुरातन काळापासून माणूस आणि निसर्ग कसे एकमेकांच्या सहजीवनातून रहात आले आहेत व मानवी जीवनात निसर्गाचे स्थान अमूल्य आहे, याची माहिती दिली. मनुष्याने स्वतःच्या सुखाकरिता पर्यावरणाचे अतिनुकसान केल्याने त्याचे दुष्परिणाम मनुष्यालाच भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत पर्यावरण आणि पर्यावरणाच्या आव्हानावर विचार विमर्श करण्याची वेळ आली असून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ सत्यप्रिय इंदुरवाडे, डॉ नितीन डोंगरवर, राजेंद्र कोरडे व इतर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन डॉ सदफ खान यांनी केले तर आभार सिद्धेश शेंडे यांनी मानले. याप्रसंगी विविध विभागातील प्राध्यापक वृंद, संशोधक आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक डॉ नितीन कायरकर, डॉ प्रियंका उके, डॉ पायल चामटकर, रजत इरपाते, उमेश पवार, नीता जगताप, विलास सूर्यवंशी, अमिता महातळे, किरण, प्रतीक झाडे यांनी परिश्रम घेतले.