उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘बुध्दासोबत क्षणोक्षणी’ या विषयावर डॉ आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान संपन्न
जळगाव : भावना, विचार आणि वर्तन यावर गौतम बुध्दांनी अधिक उत्तम भाष्य केलेले असल्यामुळे बुध्द हे जगातील पहिले संज्ञात्मक मानसशास्त्रज्ञ ठरतात असे प्रतिप्रादन सुप्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ तथा लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या गौतम बुध्द अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने डॉ नाडकर्णी यांचे ‘बुध्दासोबत क्षणोक्षणी’ या विषयावर शुक्रवार दि १६ ऑगस्ट रोजी व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ आनंद नाडकर्णी यांनी गौतम बुध्दांच्या विचारांवर काव्यात्म भाष्य करतांना अनेक पैलु उलगडून दाखविले. महायानातील ध्यान पध्दतीचा मानसिक आरोग्यात वापर होत असल्याचे ते म्हणाले.
बुध्द हे शोधाच्या प्रक्रियेला महत्व देतात आणि ती निरंतर चालनारी प्रक्रिया आहे. ते आपल्याला उत्कृष्टतेकडे नेतात ध्यान म्हणजे एकाग्रता नाही. निराशा, राग, असुरक्षितता या भावना ध्यानामुळे दुर होतात आणि आत्मविश्वास निर्माण होतो. माणूस इर्षा, आकांक्षा यामागे पळत राहतो, माझे-माझे करण्यात स्वत:ला अवकाश देत नाही. त्यास्थितीत बुध्द कामी येतात कारण गौतमबुध्द हे ऐतिहासिक, प्रयोगशिल पुरूष आहेत. आयुष्याकडे उन्मेषाने बघायला ते शिकवतात. स्वत:च्या विकासासाठी लोकसेवा करा असे ते म्हणतात. ते समतेचे उद्गाते आहेत. बुध्दांच्या मांडणीतील सामाजिक विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असे सांगून डॉ नाडकर्णी यांनी बुध्द विचार हा वैश्वीकतेचा आणि ‘मी’ ची मुक्ती करणारा असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी प्रत्येकक्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे मानसिक आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले असून मानवी मूल्य मागे पडत असल्या बद्दल खंत व्यक्त केली. शिक्षणातून पंखांना बळ मिळावे आाणि आपली मुळे कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक गौतम बुध्द अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ संतोष खिराडे यांनी केले. गौरव हरताळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा म सु पगारे यांनी आभार मानले.