अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालक पदी डॉ अजय लाड रूजू
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालकपदी यवतमाळ येथील डॉ अजय भाऊराव लाड यांची नियुक्ती झाली असून, मंगळवारी डॉ अजय लाड यांनी संचालक पदाचा पदभार माजी संचालक डॉ स्वाती शेरेकर यांचेकडून स्वीकारला.
डॉ अजय लाड हे यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर शैक्षणिक परिषद, आर आर सी चे सदस्य, याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, गोंडवाना विद्यापीठातील भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे आर आर सी चे सदस्य आहेत. यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे ते समन्वयक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.
याशिवाय आय क्यु ए सी व संशोधन केंद्राचे सुध्दा समन्वयक म्हणून कार्य केले आहे. त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा २५ वर्षाचा अनुभव असून आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ६० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, तर १ पेटेंटही त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर २ पुस्तके व राष्ट्रीय स्तरावर ६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ संशोधक विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी मिळविली असून ८ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करित आहेत.
डॉ अजय लाड नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालकपदी रुजू झाल्याबद्दल त्यांचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.