श्री दुरदुंडीश्वर मठ संस्थानाकडून शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासनाला दोन लाख रुपयांची देणगी

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्याकडे शिष्टमंडळाने स्वाधीन केला धनादेश

कोल्हापूर : महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या शरण-शरणींचा इतिहास आणि साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे.

नुकतेच या अध्यसनाच्या कार्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडील तीन कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच लोकवर्गणीतून निधी संकलनाची मोहीम राबवली जात आहे. आजवर याद्वारे १५ लाखांचा निधी संकलित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागामध्ये असणाऱ्या निडसोशी येथे श्री दुरदुंडीश्वर सिद्धसंस्थान मठ आहे. येथील मठाधिश शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांना शरण साहित्य अध्यासनासाठी लोकवर्गणीतून निधी संकलन चालू असल्याचे समजताच त्यांनी तत्परतेने याची दखल घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रथमच अशाप्रकारे महात्मा बसवण्णा व त्यांच्या शरण-शरणींच्या साहित्याचा अभ्यास केला जाणार असल्याविषयी स्वामीजींनी आनंद व्यक्त केला. या शैक्षणिक-सामाजिक कार्यास अग्रक्रमाने आपल्या मठातर्फे हातभार लावण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. शरण साहित्य अध्यासनासाठी दासोह स्वरूपात दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांनी देऊ केला. शुक्रवार दि ३० ऑगस्ट रोजी मठाच्या शिष्टमंडळातर्फे सदरचा धनादेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Advertisement

महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी निर्माण केलेल्या साहित्यात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मानवी मूल्ये पदोपदी दिसून येतात. भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, संसदीय कार्यपद्धतीची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आदी मूल्यांचा अंतर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. ‘कायकवे कैलास’ या वचनाद्वारे शरणांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देत आर्थिक-सामाजिक समानतेचे प्रतिपादन वचन साहित्यातून केले आहे. अनुभव मंटपाच्या माध्यमातून समग्र क्रांती घडवली होती.

शरण चळवळ प्रामुख्याने कर्नाटकात उदयास आली असली तरी तिचा प्रसार, प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये व्यापक स्वरूपात आढळतो. महात्मा बसवण्णा हे देखील महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे दीर्घकाळ वास्तव्यास होते. सोलापूर येथील शरण सिद्धरामेश्वर, गुड्डापूर येथील शरणी दनाम्मा, उरलिंग देव, उरलिंग पेद्दी यासारखे महाराष्ट्रातील अनेक शरण-शरणी या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. यामुळेच महाराष्ट्रातील महानुभाव परंपरा, वारकरी भक्ती चळवळ, सत्यशोधक समाज चळवळ यांचे पूर्वानुबंध शरण साहित्यात असल्याचे दिसून येतात. हा लुप्त साहित्यिक-सामाजिक वारसा पुनःप्रकाशित आणण्याचे महत्त्वाचे काम शरण साहित्य अध्यासनामार्फत केले जाणार आहे.

हे कार्य अधिकाधिक व्यापक व लोकोपयोगी व्हावे यासाठी समाजातिल प्रत्येक घटकाने शरण साहित्य अध्यासन उभारणीमध्ये यथाशक्ती दासोह करावा असा संदेश शिवलिंगेश्वर म्हास्वामीजी यांनी दिला आहे. निडसोशी मठातर्फे मिळालेला देणगीरुपी धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द करतेवेळी शिष्टमंडळामध्ये विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी, गडहिंग्लज वीरशैव समाज अध्यक्ष राजशेखर दड्डी, बसवेश्वर पुतळा स्मारक प्रतिष्ठानचे संचालक व लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष बसवराज आजरी, जंगम समाज अध्यक्ष महेश तुरबतमठ, निखिल शिरूर, सिनेट सदस्य ऍड अभिषेक मिठारी, यश आंबोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page