संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वर्धापन व कामगार दिनानिमित्त गरजूंना वस्त्रदान
संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचा उपक्रम प्रशंसनीय – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचा विद्यापीठाकडून तंतोतंत पालन होत आहेच, याचा मला अतिशय अभिमान असून विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राव्दारे गरजूंना वस्त्रदान करुन संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचे यथोचित पालन करण्यात आले आहे, हा अतिशय प्रशंसनीय उपक्रम असल्याचे उद्गार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठाचा वर्धापन दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित वस्त्रदान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्य शासनाच्या कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड निलेश हेलोंडे, व्य प सदस्य डॉ भैय्यासाहेब मेटकर, प्रबोधनकार तथा साहित्यिक डॉ सतिश तराळ, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, अध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते महिला व पुरुषांना वस्त्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रबोधनपर व्याख्यान देतांना डॉ सतिश तराळ म्हणाले, संत गाडगे बाबांचे विचार व कार्यानुसार आज प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. गाडगे बाबा शिकले नसतांनाही त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी दिलेले विचार चिंतनीय आहे. बाबांच्या विचाराला अनुसरुन संत गाडगे बाबा अध्यासनाने केलेला गरजूंना वस्त्रदान कार्यक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी अॅड निलेश हेलोंडे, डॉ भैय्यासाहेब मेटकर, डॉ सतिश तराळ, कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थांच्या प्रतिनिधींनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी चिल्ड्रेन्स फेलोशिप ऑफ इंडिया, नया अकोला, दिशा संस्था, अमरावती, मुक्तांगण बहुउद्देशीय संस्था, अमरावती, समर्पण बहुउद्देशीय संस्था, अमरावती, बॉईज अॅन्ड गल्र्स ख्रिश्चन होम, चांदुरबाजार, मंजितसिंग हिरासिंग शिख जळगांव जामोद, बुलडाणा या संस्थांनी संत गाडगे बाबा यांच्या दशसूत्रीनुसार विशेषत: शिक्षण व अनाथ मुले, अनाथांना मदत, पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा अध्यासनाच्यावतीने कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते शॉल व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश अध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे यांनी सांगितला. कार्यक्रमाचे संचालन राजेश पिदडी यांनी तर आभार प्रा शुभांगी बोराळकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.