२० व २१ मार्च रोजी अमरावती विद्यापीठात जिल्हास्तरीय ‘विकसित भारत युवा संसद-२०२५’ चे आयोजन
निवड झालेल्या दिडशे विद्यार्थ्यांमधून १० विद्यार्थ्यांची होणार राज्यस्तरीय युथ पार्लमेंटकरिता निवड
अमरावती : केंद्र सरकारच्या युवा कार्य व खेळ मंत्रालयव्दारा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत युथ पार्लमेंट – २०२५’ चे आयोजन दिनांक २० व २१ मार्च, २०२५ रोजी विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे. विकसित भारत युवा संसद स्पर्धेत १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम या चार जिल्ह्रांतील १८ ते २५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकडून दि १६ मार्च पर्यंत माय भारत पोर्टलवर स्वत:च्या वकृत्व शेैलीत विकसित भारत म्हणजे तुमच्यासाठी काय? या विषयाचा एक मिनिटाचा व्हिडीओ मागविण्यात आला होता. त्यामधून दि १७ मार्च, २०२५ रोजी स्क्रिनिंग कमिटीद्वारे १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दि २० व २१ मार्च रोजी ‘वन नेशन, वन इलेक्शन : पेव्हींग दी वे फॉर विकसित भारत’ या विषयावर आपले मत ३ मिनिटांमध्ये मांडावे लागणार आहे. सदर १५० विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय युथ पार्लमेंट-२०२५ करिता निवड करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला कुलगुरु डॉ मिलींद बारहाते, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, अधिसभा सदस्य डॉ प्रशांत विघे, अमित देशमुख, नितिन टाले, माजी पोलीस अधीक्षक पी टी पाटील, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ देवलाल आठवले, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, डॉ निलेश कडू, जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र स्नेहल बासुतकर यांची उपस्थिती राहणार आहे.