देवगिरी महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाला पर्यावरणीय उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘जागतिक जल दिन’ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांसाठी ‘बेस्ट ग्रीन क्लब पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. जलसंवर्धनासाठी राज्यस्तरावर ग्रीन क्लबतर्फे घोषवाक्य रॅली, भित्तीपत्रक स्पर्धा, लघुचित्रफीत स्पर्धा, काव्यवाचन या स्पर्धांमध्ये देवगिरी महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबने उत्कृष्ट कामगिरी केल्याने हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
युवकांमार्फत नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पाण्याची बचत या अभियानांतर्गत ग्रीन क्लबची स्थापना करून विविध उपक्रम सातत्यपूर्ण यशस्वीपणे राबविले गेले तसेच विद्यार्थ्यांनी जागतिक जलदिन उत्साहात साजरा केला. भित्तिपत्रक स्पर्धेत महाविद्यालयातील गायत्री गोरे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झाले होते आणि महाविद्यालयाला वायईडब्ल्यूएस ‘बेस्ट ग्रीन क्लब’ म्हणून गौरविण्यात आले.
हे उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन क्लब समन्वयक डॉ रंजना गावंडे, सदस्य डॉ आनंद माने यांनी यशस्वीपणे राबविले. तसेच विभागीय समन्वयक राहुल गिरी, जिल्हा नोडल अधिकारी प्रा डॉ दत्तात्रय पानसरे यांचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्कारासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे यांनी अभिनंदन केले.