एमजीएममध्ये प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मानाचे वितरण संपन्न
उद्योजक श्रीकांत बडवे आणि उद्योजक स्वप्नेषु बसेर यांना करण्यात आले सन्मानित
छत्रपती संभाजीनगर : एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे यांचा पहिला स्मृती दिन एमजीएम विद्यापीठामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करीत पाळण्यात आला. याचाच भाग म्हणून जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २ माजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले. वर्ष २०२४ चा ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ उद्योजक श्रीकांत बडवे आणि उद्योजक स्वप्नेषु बसेर यांना रुक्मिणी सभागृहात प्रदान करण्यात आला.



यावेळी, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, प्रमुख पाहुणे समीर पाटील, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, शशिकला बोराडे, भूषण बोराडे, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, प्राध्यापक, जेएनईसीचे माजी विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘प्राचार्य प्रताप बोराडे दि ग्रेट वॉल ऑफ एमजीएम’ या रवींद्र तहकीक लिखित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच एच शिंदे यांनी केले तर आभार उपप्राचार्या प्रा डॉ विजया मुसांडे यांनी मानले.
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ स्वरूप
स्मृतीचिन्ह, शाल, महात्मा गांधी पुतळा, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम रुपये १ लक्ष
कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना खालीलप्रमाणे आहेत :
कमलकिशोर कदम, अध्यक्ष, महात्मा गांधी मिशन ट्रस्ट :
प्रतापराव बोराडे यांच्या नावाचा सन्मान आज त्यांच्या कर्तबगार विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. प्रतापराव म्हणजे चैतन्याचा खळखळता प्रवाह होता. कितीही बिकट परिस्थिती असली तरी त्यावर मात करून ते मार्ग काढत असत. आज ते आपल्यात नाहीत, ही कल्पना असह्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. संस्थेपेक्षा विद्यार्थी मोठे होणे हे संस्थेचे भाग्य असते. अशी प्रतिभा असणारे विद्यार्थी त्यांनी घडवले. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय हे समाजामध्ये एक समर्थ प्रतिनिधी म्हणून उभे राहिले. या महावविद्यालयास एक ओळख, एक सन्मान, एक नाव प्रतापरावांनी प्राप्त करून दिले. प्रतापराव आज हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या रूपाने आपण आमच्यात जिवंत आहात. व्यावसायिक क्षेत्रात बडवे आणि बसेर यांनी जे दैदिप्यमान यश संपादक केले आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो.
अंकुशराव कदम, सचिव, महात्मा गांधी मिशन ट्रस्ट :
प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी हजारो विद्यार्थी घडवले. आज हे विद्यार्थी जगभरात उत्तुंग काम करीत आहेत. दरवर्षी ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ हा सन्मान जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आपण देणार आहेत. यावर्षी आपण श्रीकांत बडवे आणि डॉ स्वप्नेषु बसेर यांचा सन्मान करीत आहोत. या दोघांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग काम केले असून त्या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो. एमजीएम आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नांदेड, परभणी, गांधेली आणि नोएडा अशा विविध ठिकाणी कार्यरत आहे.
डॉ विलास सपकाळ, कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ :
दरवर्षी ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ जेएनईसी’च्या एका माजी विद्यार्थ्यास देण्यात येणार आहे. सन्मानार्थी यांना दिले जाणारे स्मृतिचिन्ह हे पूर्णपणे ३ डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले असून याची निर्मिती एमजीएम आयआयआरसी या केंद्रामध्ये करण्यात आली आहे. यामधे बायो डिग्रेडबल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. जे ‘स्मृती चिन्ह’ देऊन उद्योजक श्रीकांत बडवे आणि उद्योजक स्वप्नेशू बसेर या मान्यवरांच्या सन्मान आपण करीत आहोत. या दोन्ही मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभासंपन्न असे काम केलेलं आहे. हे दिलेले स्मृती चिन्ह सन्मानार्थी यांच्या जीवनात कायम बोराडे सरांची प्रेरणा जिवंत ठेवेल, अशी आशा व्यक्त करतो.
समीर पाटील : ज्येष्ठ अभिनेते
मी बनवलेले सर्व चित्रपट सरांनी पाहिले होते. विद्यार्थी घडविण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतित केले. विद्यार्थी चुकल्यावर सरांनी कधी त्यांचा हात आखडता घेतला नाही आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करताना कधीच स्वत:च्या मनाला आणि शब्दाला आवर घातला नाही. आम्हा सर्व विद्यार्थ्यांनी बोराडे सरांची शिस्त, आदर, धाक पाहिला आणि अनुभवला आहे. सरांनी आमच्यात सकारात्मकता रुजवली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात सरांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. सर हे तर शिक्षक होतेच मात्र, ते सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक होते. आज सरांचे विद्यार्थी जगभरात विविध क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभासंपन्न काम करीत आहेत.
श्रीकांत बडवे : सन्मानार्थी
प्रतापराव बोराडे सरांकडे प्रत्येक गोष्टींवरील उत्तर होते. आम्ही आमच्या जीवनात यशस्वी होण्यास्तव त्यांनी कायम आम्हांला विश्वास आणि प्रेरणा दिली. सरांचे प्रत्येक विद्यार्थ्यांशी चांगले नाते होते. सरांनी आमच्या जीवनात एक शिक्षक म्हणून तर भूमिका निभावलीच मात्र, यापुढे जात ते आमच्यासाठी आई, वडील, मित्र अशा प्रत्येक भूमिकेतून जगले. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंतचा यशस्वी प्रवास करू शकलो.
स्वप्नेषु बसेर: सन्मानार्थी
माझ्या जडणघडणीत प्राचार्य बोराडे सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आमच्यासारख्या बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली. आईची माया आणि वडिलांची शिस्त दिली. नेतृत्व कौशल्य शिकवले. जबाबदारी सांभाळत अभ्यास कसा करायचा, याचे मार्गदर्शन केले. सरांचे केवळ विद्यार्थ्यांशी नाते नव्हते तर विद्यार्थ्याच्या परिवाराशीही नाते असायचे. सरांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करण्याची इच्छा आहे. ‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ देऊन मला सन्मानित केले, त्याबद्दल मी एमजीएम’चे मनापासून आभार मानतो.
‘प्राचार्य प्रताप बोराडे स्मृती सन्मान’ २०२४ वर्षाचे सन्मानार्थी यांच्याबद्दल माहिती
१. श्रीकांत बडवे : श्रीकांत बडवे हे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे सन १९८७ सालचे विद्यार्थी आहेत. त्यांनी १९८७ साली १ लक्ष आणि ३ कर्मचाऱ्यांसह बडवे इंजिनियरिंग लि. (बेलराईस इंडस्ट्रीज) कंपनीची स्थापना केली. आज कंपनीची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटी रूपयांची असून कंपनी शीट मेटल पार्ट्स, फॅब्रिकेशन अँड प्लास्टिक, कोटिंग ऑन मेटल्स असे विविध उत्पादने बनवते. कंपनीचे आज देशभरातील २८ ठिकाणी उत्पादन कारखाने असून यामध्ये सुमारे १५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये नॅशनल अवॉर्ड फॉर इंटरप्रुनरशिप, नॅशनल अवॉर्ड फॉर क्वालिटी प्रोडक्टस, नॅशनल अवॉर्ड फॉर रिसर्च अँड डेव्हपमेंट अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
२. डॉ स्वप्नेषु बसेर : स्वप्नेषु बसेर यांनी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनियरिंग शाखेची सन १९८७ साली पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी दिल्ली येथून एम टेक आणि आयआयटी मुंबई येथून आपली पी.एचडी पूर्ण केली आहे. सध्या ते देवेन सुपरक्रिटिकल प्रा लि कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले असून अनेक पेटेंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून यामध्ये एक्सलन्स इन इंटरप्रेनरशिप इन रिसर्ज अँड इनोव्हेशन अवॉर्ड, इकॉनॉमिक टाईम्स एमएसएमई एक्सलन्स आयकॉन्स अवॉर्ड, टेक्नॉलॉजी डेव्हलपर अवॉर्ड, यंग इंजिनियर अवॉर्ड आदींचा समावेश आहे.