राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

आदर्श शिक्षक हा विद्यार्थीच असतो – डॉ प्रेम लाल पटेल

नागपूर : विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनेतून शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक हा विद्यार्थीच असतो, असे प्रतिपादन विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचे संचालक डॉ प्रेम लाल पटेल यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शिक्षक दिन समारंभ कॅम्पस चौक ते अंबाझरी टी पॉइंट मार्गावरील गुरुनानक भवन येथे गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी पार पडला. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ पटेल प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचे संचालक डॉ प्रेम लाल पटेल, प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांची उपस्थिती होती. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन साजरा केला जात असल्याचे डॉ पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले.

शिक्षकी पेशा किती महत्त्वाचा आहे, याचे उदाहरण देताना देशाचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु देखील शिक्षक आहेत तर राष्ट्रपती पद भूषविल्यानंतर भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी शिक्षक म्हणून कार्य केल्याचे डॉ पटेल यांनी सांगितले. मुलाची प्रगती झाल्याने जसा पालकांना अभिमान वाटतो तसाच अभिमान विद्यार्थ्याने उच्च शिखर गाठल्याने त्यांच्या शिक्षकांना वाटतो. नवनवीन संकल्पनेतून शिक्षण देण्याचे कार्य करताना विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे असे कार्य शिक्षकांकडून अपेक्षित आहे. आपल्या उच्चतम क्षमतेतून विद्यार्थी घडविण्याचे आवाहन डॉ पटेल यांनी यावेळी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना उच्चतम क्षमतेकडे नेण्याचे कार्य शिक्षकांनी केले पाहिजे. पीएच डी संशोधक ज्याप्रमाणे स्वतंत्र संशोधक असतात. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे. समस्यांची सोडवणूक करून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करावे, असे डॉ पटेल म्हणाले.

अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी देशाच्या विकासात शिक्षकांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असून देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे विद्यार्थी म्हणजेच नागरीक घडविण्याचे कार्य शिक्षकांनीच केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील जीवती येथील मुलगी जर्मनीत नोकरीसाठी जात आहे, याचे श्रेय तेथील विपरीत परिस्थितीत शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना जातात असे डॉ. बोकारे म्हणाले. जगातील प्रत्येक देशात, प्रत्येक भागात भारतीय असून ते चांगले कार्य करीत आहे. ही प्रगती केवळ शिक्षकांमुळेच झाली आहे. शिक्षकांमुळेच देश गौरवास प्राप्त होत आहे. शिक्षक कधीच अप्रासंगीक राहू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला प्रासंगीक ठेवण्यासाठी बदलावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

प्रास्ताविक करताना प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. शिक्षक हा जीवनात आशा, शांती, समृद्धी निर्माण करीत असल्याचे सांगितले. मनुष्याला योग्य दिशेने वाटचाल करण्याकरिता शिक्षक अर्थात गुरुच प्रेरित करीत असतो, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले.

पुरस्कारांचे वितरण

प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते डॉ आर कृष्णकुमार सुवर्णपदक पुरस्कार एस बी‌ सीटी महाविद्यालय उमरेड रोड नागपूर येथील प्राचार्य डॉ सुजित गजाननराव मेत्रे, उत्कृष्ट प्राचार्य (शहरी विभाग) पुरस्कार जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हिंगणा रोडचे प्राचार्य डॉ सचिन पी उंटवाले, उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण विभाग) सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विहीरगाव उमरेड रोड नागपूरचे प्राचार्य डॉ विठ्ठल गुलाबराव अरजपुरे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ नंदकिशोर एन करडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतून मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर येथील डॉ प्रिन्स अजयकुमार तेजराम आगाशे (ग्रंथपाल), उत्कृष्ट संशोधक पुरस्कार (विद्यापीठ शैक्षणिक विभागातून) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ विना एस बेलगमवार, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार (विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून) सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी गावसी मानापूर वर्धा रोड नागपूर येथील डॉ मिनहाज अहमद ए रहमान, उत्कृष्ट लेखक पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहीतीशास्त्र विभागातील डॉ शालिनी आर लिहितकर तर उत्कृष्ट समाजकार्य पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय प्रबंधन विभागातील डॉ राहुल श्याम खराबे यांना वितरित करण्यात आला.

वार्षिकांक स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण

विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेतील १० हजार रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर, ७ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांक हिस्लाॅप कॉलेज नागपूर, ५ हजार रुपयांचा तृतीय क्रमांक गोविंदराम सेकसरीया वाणिज्य महाविद्यालय, वर्धा तर जिल्हा निहाय ३ हजार रुपये प्रत्येकी उत्तेजनार्थ पुरस्कार नागपूर ग्रामीण मधून सेठ केसरीमल पोरवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कामठी, भंडारा जिल्ह्यातून यशवंतराव चव्हाण कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातून जगत कला वाणिज्य आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव, जळगाव जिल्ह्यातून श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ यांना वितरित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page