रान भाज्यांतील रोग प्रतिकारक पोषक तत्व शोधा – कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी
गृह विज्ञान विभागात रानभाजी महोत्सव
नागपूर : विविध आजारांवर रामबाण असलेल्या रानभाज्यांमधील रोगप्रतिकारक पोषकतत्व संशोधनातून शोधून काढा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्ताने गृहविज्ञान विभागात शुक्रवार, दिनांक २१ जुलै २०२३ रोजी रानभाजी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन करताना डॉ. चौधरी बोलत होते. गृहविज्ञान विभागाच्या सभागृहात विविध प्रकारच्या २७ रानभाज्या तसेच त्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. या प्रदर्शनीची पाहणी करीत असताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी रानभाज्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचा शोध घ्या, असे आवाहन करीत त्यामध्ये असलेल्या पोषकतत्त्वांचा कोणकोणत्या आजारांवर प्रतिकारक म्हणून वापर होऊ शकतो याचे संशोधन करा. त्याचप्रमाणे या संशोधनाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश दिला.
प्रदर्शनीची पाहणी माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, गृह विज्ञान विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव, ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, अधिसभा सदस्य याकूब शेख, भूविज्ञान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कीर्तीकुमार रणदिवे, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप तुमाने, उपकुलसचिव प्रदीप बिनिवाले उपस्थित होते. सौ. रसिका चौधरी यांनी एक्सपोला भेट देत रानभाज्यांबाबत माहिती जाणून घेतली. महोत्सवात एकूण २७ रानभाज्यांचे महत्त्व विषद करणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. ताज्या भाज्या, सुकवलेल्या भाज्या, पावडर, त्याचे विविध प्रकारचे पदार्थ, चटण्या, उत्तप्पा, भाकर, पोळी आदी वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय या रानभाज्यांमध्ये असलेले विविध प्रकारचे पोषणतत्व याबाबत माहिती देण्यात आली. रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्वे (न्यूट्रिशन), विटामिन्स, मिनरल्स, फायबर असतात. शिवाय कॅन्सरला प्रतिकार करणारे पोषणतत्व देखील या रानभाज्यांमध्ये असते, अशी माहिती एक्स्पोचे समन्वयक डॉ. प्राजक्ता नांदे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव, समन्वयक डॉ. प्राजक्ता नांदे, डॉ. शुभदा जांभुळकर, मीनाक्षी सुपांडे, डॉ. वंदना धवड यांच्यासह विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
रानभाज्यांपासून विविध पदार्थ
विद्यापीठाच्या गृह विज्ञान विभागात आयोजित एक्सपोमध्ये तरोटा, खापरखुटी, पातूर, अरदफरी, चिंचेचे पान, शेवगा, आघाडा, लाल भाजी, चिवळ, मुळ्याची पाने, फुलगोभीची पाने, घोळभाजी, तांदुजा अशा विविध वनस्पतींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने या रानभाज्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले होते.
औषधीय गुण
आपल्या सभोवताल आढळणाऱ्या रान भाज्यांमध्ये विविध प्रकारचे औषधीय गुण आढळून येते. रानभाज्यांचे पावडर करीत कॅप्सूल स्वरूपात अत्यंत महागड्या दरांमध्ये विक्री केली जाते. मात्र त्या ऐवजी नैसर्गिक रानभाज्यांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल असे गृह विज्ञान प्रमुख डॉ. कल्पना जाधव यांनी सांगितले.