एमजीएममध्ये महात्मा गांधी यांच्या स्मृतींना मान्यवरांनी केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी यांनी नयी तालीमचे पाहिलेले स्वप्न आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सत्यात उतरताना दिसत आहे. महात्मा गांधी हे जगातील एक स्वीकारार्ह नेते असून ते संपूर्ण जगाचे आदर्श असल्याचे प्रतिपादन लेखक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी आज येथे केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात लेखक प्रा.सुनीलकुमार लवटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, शिक्षणाधिकारी विश्वास सुतार, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
प्रा. लवटे पुढे बोलताना म्हणाले, शिक्षणाची ही जी परंपरा आहे ती मुलत: गांधी विचारांचा विकास असून त्याला एमजीएम विद्यापीठाने वैश्विक बनवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. एमजीएम विद्यापीठात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते ही निश्चितपणे हेवा वाटावा अशी गोष्ट आहे. शांती निकेतन नंतर इतका दीर्घ विचार एका शिक्षण संस्थेने केलेला मला पहिल्यांदा पाहायला मिळतोय. देशामध्ये ज्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची आहे त्यांनी एमजीएम विद्यापीठाकडून आदर्श घेतला पाहिजे. एमजीएम विद्यापीठ हे शिक्षणाचे प्रजासत्ताक असून ज्याला जे शिकायचे आहे ते शिकण्याची संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
समकालीन काळामध्ये महात्मा गांधी यांचे विचार प्रभावशाली आहेत. मनुष्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे असे शिक्षण असायला हवं हा संदेश त्यांनी दिला आहे. तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि कौशल्य विकास या माध्यमातून गांधीजींनी आपल्याला शिक्षणाची नवी दिशा दिली आहे. आज या प्रसंगी आपण गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन करीत असताना त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे. गांधीजी म्हणाले होते की, विचार जेंव्हा आचरणात येतात तेंव्हाच परिवर्तन होते; हा विचार आपण अंगीकारणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
आज सकाळी ०९:३० वाजता चिंतन गाह येथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गायक राहुल खरे आणि प्रा.भक्ति बनवस्कर यांनी प्रार्थना आणि भजन सादर केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित संदेश दिला. हुतात्मा सैनिक आणि महात्मा गांधी यांच्या स्मृतींना यावेळी २ मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले. शांती मंत्राने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा देशपांडे यांनी केले.