देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

दोन विद्याशाखांना मिळाले ‘एनबीए’चे मानांकन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या दोन विद्याशाखांना नुकतेच नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडीएशनचे (एन बी ए) मानांकन मिळाले आहे. पुढील तीन वर्षासाठी सदरील मानांकन मिळविणारे देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मराठवाड्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने यांनी दिली.

नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडीएशन (एन.बी.ए.) ही उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासणारी दर्जेदार व अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशपातळीवर उच्च शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांची गुणवत्ता (मूल्यमापन) तपासली जाते. 23 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान एन.बी.ए.च्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता, महाविद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक’म, योजना, टीचिंग व लर्निंग पध्दत, अद्यावत संशोधन कार्य, पेटंट, प्रोजेक्ट, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, मूलभूत सोयीसुविधा आदींची पाहणी केली होती. या पाहणीनंतर एन.बी.ए.ने नुकतेच मानांकन जाहीर केले असून त्यात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या दोन विद्याशाखांना तीन वर्षांसाठी एन.बी.ए.मानांकन जाहीर केले आहे.

Advertisement

सदरील मानांकन मिळाल्याने महाविद्यालय केंद्र शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांसाठी पात्र ठरणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन कार्यास प्रोत्साहन मिळणार आहे. एन.बी.ए.चा मुळ पाया ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ असल्याने शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहते. ‘नॅक’चा ‘ए’ ग्रेड, ‘एन.ए.बी.एल.’चे मानांकन याबरोबर आता ‘एन.बी.ए.’चे मानांकन असे तिन्ही मानांकन मिळविणारे देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय असल्याचे डॉ सुभाष लहाने यांनी सांगितले.

एन.बी.ए.च्या मानांकनासाठी मु’य समन्वयक डॉ सुभाष लहाने, विभाग प्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ.जी.आर.गंधे, डॉ.आर.एम.औटी, डॉ.सचिन बोरसे, प्रा.संजय कल्याणकर, डॉ.शेख शोएब, डॉ.रूपेश रेब्बा, प्रा.अमर माळी आदींनी महत्वाची भूमिका बजावली. या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळुंके, सरचिटणीस आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारिणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ.एस.व्ही.लहाने, संचालक डॉ यु डी शिऊरकर आदींनी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page